देशातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी सुविधांच्या अंतर्गत प्रवाशांना मोफत वाय-फाय सेवा देण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार आता मुंबई सेंट्रल स्थानकावर ही सेवा सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही सेवा २२ जानेवारीला सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात प्रवाशांसाठी अर्धा तास मोफत वाय-फाय सेवा सुरू केली होती. मुंबई सेंट्रल स्थानकावरील सेवा गुगलतर्फे पुरवण्यात येणार आहे. ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता रेल्वे अधिकाऱ्यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ही सेवा पहिल्या अध्र्या तासासाठी मोफत असेल. त्यासाठी प्रवाशांना पासवर्ड पाठवला जाणार आहे. या सेवेची सुरुवात २२ जानेवारीपासून करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.