करोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी, ८ ऑगस्ट रोजी केली. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम आज, बुधवारी ११ ऑगस्टपासून मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आले आहे. यात प्रवाशांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इ.) रेल्वे स्थानकातील मदत कक्षातील कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्यावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. लशीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी केवळ मासिक पास काढणाऱ्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. दैनंदिन तिकीटासाठी ही सुविधा मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतुकीमुळे जाणार जास्तीचा वेळही वाचणार असून प्रवासासाठी आता नागरिकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच हा निर्णय घेतल्याबद्दल प्रवाशांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.