मुंबईः आत्महत्या केलेल्या एका तरुणाच्या बँक खात्यातून सुमारे ८२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या संतकुमार ऊर्फ गुड्डन भरीसिंह याच्याविरोधात बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेगाव येथील भगतसिंग नगर क्रमांक एक, क्रांती चाळ, प्रगती सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनोज खराडे याने 25 ऑगस्ट 2019 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मनोजने आत्महत्या करण्यापूर्वी २२ ऑगस्टला त्याच्या बँक खात्यातून अन्य एका बँक खात्यात ८२ हजार रुपये हस्तांतरीत केले होते. हा प्रकार त्याच्या बहिणीच्या लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता ही रक्कम उत्तरप्रदेशातील पंकज ब्रम्हचारी आणि कैलास हरिश्‍चंद्र यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच बांगुरनगर पोलिसांचे एक विशेष पथक उत्तरप्रदेशातील दोन्ही बँक खातेदारांच्या घरी गेले. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात संतकुमारने हस्तांतरीत केली होती. त्यानेच त्यांच्याकडून आधारकार्डसह इतर कागदपत्रे घेऊन त्यांच्या नकळत दोन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक खाते उघडून ही फसवणुक केली होती. संतकुमार हा उत्तरप्रदेशच्या आग्रा, पड्डमपुराचा रहिवाशी आहे. त्याने मनोजला खोटे कारण सांगून पैसे हस्तांतरीत करण्यास प्रवृत्त केले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच तीन वर्षांनी संतकुमार ऊर्फ गुड्डन याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संतकुमारच्या अटकेसाठी बांगुरनगर पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच उत्तरप्रदेशला जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funds deceased bank account case registered accused mumbai print news ysh
First published on: 02-08-2022 at 15:19 IST