राज्यात युतीची सत्ता असताना, माझ्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी पालिकेची सत्ता हवी कशाला, सरकारने नोटीस न देता माझ्या संपत्तीची चौकशी करावी, त्यात दोषी आढळल्यास तुरुंगात टाकावे. नवी मुंबई पालिकेतील कारभाराची चौकशी करताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई व ठाणे पालिकेचीही चौकशी करावी, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
ठाणे पालिकेतील ४२ टक्क्याचे आरोप तर दिवंगत आनंद दिघे यांनी केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्र्यांनी चुकीच्या माहितीवर हे आरोप केले असून पुराव्याअभावी आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला.मुख्यमंत्र्यांनी आपले नाव न घेता तिजोरी भरल्याचा आरोप केला आहे. त्यांना पुरविण्यात आलेल्या माहितीवर हा आरोप असून त्यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी, त्याचबरोबर मी मंत्रिमंडळात १३ वर्षांत सात विभाग सांभाळले आहेत. त्याचीही खुली चौकशी करावी, असे आव्हान नाईक यांनी दिले.  शिवसेनेने मला पक्षातून काढले होते. मी पक्ष सोडला नव्हता. याची माहिती उद्धव यांना नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप सहन करणार नाही. हिंदू धर्मात अग्निसंस्कार केले जातात, गाडले जात नाही याची माहिती उद्धव यांनी घ्यावी असा टोला नाईक यांनी लगावला.