गेले दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची तितक्याच उत्साहात सांगता करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्त आज सज्ज झाले आहेत. आवडत्या बाप्पाला आज थाटामाटात मुंबई-पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येत आहे. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त रविवारी निरोप देत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून मध्य आणि दक्षिण मुंबईत लाखो भाविक गर्दी करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. तर पुण्यातही विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये मानाच्या गणपती पूजनानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की करण्यात आल्यीची घटना घडली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं महात्मा फुले मंडईत आगमन झालं आहे. राज्यभरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. हा सोहळा मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी जणू स्पर्धा लागते. काही जण बाप्पासोबत सेल्फी घेताना दिसतात. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. सोबतच विसर्जित मूर्तींच्या फोटोमुळे भावना दुखावल्या जाण्याचीही भीती असते. म्हणूनच विसर्जित मूर्तींचे फोटो मोबाइलद्वारे काढण्यास किंवा छायाचित्रण करण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे, तरीही कोणी असे करताना दिसल्यास मोबाइल जप्त होण्याची शक्यता आहे. भाविकांना सूचित करणारे फलक चौपाटीवर लावले असल्याचे, डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

गणेशभक्तांना प्रवास करणं सोपं जावं म्हणून आज रविवार असूनही, रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतला नाही. नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक सुरु राहणार आहे.मुंबई महापालिकेने गिरगाव, जुहू, वर्सोवा या प्रमुख चौपाट्यांवर जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी मोटारबोटी, सीसीटीव्ही यंत्रणा, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश, प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात आलीय.

पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १६२ ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. प्रत्येक विसर्जनस्थळ आणि प्रसिद्ध मंडळांच्या मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. मिरवणूक मार्गावर अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे आणि वस्त्या आहेत. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती, घटना घडू नये यादृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही सिंगे यांनी स्पष्ट केले.

शहरातील अन्य भागांच्या तुलनेत लालबाग, परळ, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी येथे भाविकांची गर्दी होते. तेथे घातपाती कृत्ये घडू नयेत, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी गुन्हे घडू नयेत, लहान मुलांचे अपहरण किंवा सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरीसारखे गुन्हे घडू नयेत यासाठी व्यूहरचना आखण्यात आल्याचे सिंगे यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.