२६ वर्षे वापराविना पडून असलेल्या भूखंडांचे पालिकेला स्मरण

शहराच्या १९९१च्या विकास आराखडय़ापासून उद्याने, बागा यासाठी आरक्षित असूनही २६ वर्षांमध्ये तसा वापर न झालेले भूखंड आता मुंबईकरांच्या वाटेला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०३४ पर्यंतच्या विकास आराखडय़ातही  आरक्षणात बदल न झालेल्या अशा ४१ भूखंडांवर २५ उद्याने व १६ क्रीडांगणे करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये मोकळ्या जागांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच मेट्रो तसेच इतर विकासकामांसाठी सातत्याने झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. यातून निर्माण होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने विकास आराखडय़ातील मंजूर उद्यानांच्या विकासाकडे पाहिले जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखडय़ातील उद्याने व क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या व यावेळच्या विकास आराखडय़ात कोणतेही बदल न केलेल्या जागा विकसित करण्याचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे.

महानगरपालिकेकडून २०१४ ते २०३४ या वर्षांसाठीचा विकास आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या आराखडय़ाला अंतिम मंजुरी मिळाली नसली तरी तांत्रिकदृष्टय़ा मंजूर असलेल्या नागरी सेवासुविधांविषयी बाबींची अंमलबजावणी करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पालिकेच्या ताब्यात असलेल्या ४१ मोकळ्या भूखंडांवर उद्याने, मैदाने तसेच क्रीडांगणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. आजघडीला पालिकेची १ हजार ४२ मोकळ्या भूखंडांपैकी ३०५ ठिकाणी क्रीडांगणे तर उर्वरित ७३७ उद्याने व मनोरंजन मैदाने आहेत. आता प्रस्तावित विकास आराखडय़ातील आरक्षणानुसार २५ नवी उद्याने व खेळण्यासाठी १६ क्रीडांगणे उपलब्ध होतील, असेही परदेशी म्हणाले.

कुठे, काय?

  • नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानांपैकी सर्वात मोठे उद्यान हे आंबिवली, ओशिवरा परिसरात ५ लाख २८ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर होणार असून सर्वात मोठे क्रीडांगण हे मालाड परिसरातील १ लाख ५ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर प्रस्तावित करण्यात आले आहे.
  • दक्षिण मुंबईत भुलेश्वर येथे एक क्रीडांगण व एक उद्यान तसेच भायखळा येथेही उद्यानाचा विकास प्रस्तावित आहे.
  • पश्चिम उपनगरात २२ उद्याने व क्रीडांगणे वाढणार असून मालाड पश्चिम व गोरेगावमध्ये प्रत्येकी तीन, अंधेरी येथील दोन, तर वांद्रे पश्चिम येथील एका उद्यानाचा समावेश आहे.
  • कांदिवलीमध्ये दोन, बोरिवली आठ व दहिसरमधील तीन भूखंडांचा मैदान किंवा उद्यान म्हणून विकास करण्याचा पालिकेचा मानस आहे.
  • पूर्व उपनगरांच्या वाटेला अधिकची १६ उद्याने/मैदाने आली असून त्यातील चार उद्याने एल वॉर्डमध्ये आहेत.
  • मुलुंडमध्ये आणखी दोन तर भांडुप, घाटकोपरमध्ये प्रत्येकी एक भूखंड विकसित करण्यात येईल. देवनार येथे दोन तर माहुल येथे एक उद्यान विकसित होण्याची शक्यता आहे.