जेनेरिक नावांनी प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार; रुग्णांमध्ये संभ्रम

केंद्र सरकारच्या योजनेनुसार मुंबईसह राज्यात १५ ठिकाणी सुरू झालेल्या जन औषधी दुकानांबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता असली तरी प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक नावांनी औषधे लिहिण्यास डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने विरोध केला आहे. औषधांचा दर्जा तसेच उपलब्धतेबाबत साशंक असल्याने रुग्णांना या औषधांची शिफारस केली जाणार नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

मार्च २०१७ मध्ये देशभरात स्वस्त दरातील औषधांच्या दुकानांची संख्या तीन हजारांवर नेण्याचा मानस केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. सध्या राज्यात १५ ठिकाणी जन औषधीची दुकाने असून त्यातील तीन मुंबई परिसरात आहेत. डोंबिवली, घाटकोपरनंतर आता बोरिवलीतही स्वस्त औषधांचे जन औषधी दुकान सुरू होत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजारांवर नियमितपणे घ्याव्या लागणाऱ्या औषधांचा खर्च परवडेनासा झाला असल्याने केवळ दुकानावर फलक पाहूनही अनेक ग्राहक या औषधांची मागणी नोंदवू लागले आहेत. सध्या या दुकानांमध्ये चारशे ते पाचशे प्रकारची औषधेच उपलब्ध आहेत. बाजारात औषधांचे साधारण पाच हजारांवर प्रकार आहेत.

ग्राहकांनी जन औषधी दुकानांकडे मोर्चा वळवला असला तरी डॉक्टर मात्र त्याकडे साशंकतेनेच पाहत आहेत. रुग्णांना स्वस्त औषधे मिळायला हवीत. मात्र या औषधांच्या दर्जाबाबत आम्ही साशंक आहोत. याशिवाय या दुकानांमध्ये सर्व प्रकारची औषधेही उपलब्ध नाहीत.

या औषधांमुळे उपचारांमध्ये फरक पडला तर त्याची जबाबदारी डॉक्टरांवर येणार असल्याने आम्ही सध्या तरी प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक नावे लिहिण्याची सक्ती डॉक्टरांवर करणार नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. जयेश लेले म्हणाले. सरकारी यंत्रणेकडून होत असलेल्या उपक्रमांचा अनुभव पाहता याबाबत आम्ही थांबा व वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या किंवा संशोधनात पैसे गुंतवणाऱ्या कंपन्यांच्या किमती अधिक असल्या तरी रुग्णावरील उपचार सर्वात महत्त्वाचे असल्याने आम्ही ब्रॅण्डेड औषधांची नावेच लिहून देणार असल्याचे आणखी एका डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कमी खर्चामुळे रुग्णांची पसंती

मधुमेह व हृदयरोगावरील दहा औषधांपैकी सहा जन औषधीमध्ये उपलब्ध झाली. मात्र तरीही महिन्याच्या औषधांचा खर्च जन औषधीमुळे पाच ते सहा हजारांवरून दोन हजारांवर आल्याने नितीन जयवंत हे ग्राहक समाधानी आहेत. पाचपैकी तीन डॉक्टरांनी या औषधांकडे फिरकू नका, असे सांगितले. दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांकडून ही औषधे येत असून त्याच्या दर्जाबाबत साशंकता आहे, असे एक डॉक्टर म्हणाले. मात्र औषधांच्या खर्चाचा ताण सहन होत नसल्याने मी स्वस्त औषधे घेत आहे, असे जयवंत म्हणाले.