जयेश शिरसाट jayesh.shirsat@expressindia.com

घाटकोपर पोलिसांनी उदयभान पाल या ३५ वर्षांच्या बेपत्ता रिक्षाचालकाचा शोध लावला तोवर एका भन्नाट रहस्यपटाला शोभेल असं कथानक जुळलं होतं. रिक्षा चालकाआडचा त्याचा खरा चेहरा, पुसटशा दुव्याने कुंभार्ली घाटात सापडलेल्या बेवारस अनोळखी मृतदेहापर्यंत दाखवलेली वाट, जळगाव-धुळ्यात मांडूळांची अवैध धरपकड करणाऱ्या फासेपारध्यांच्या टोळ्या, अंधश्रद्धाळू श्रीमंतांना कोटय़वधींचा गंडा घालण्याचं विषारी आमिष, आपापसातली फसवणूक, कर्नाटक-रायगडमधला वांझोटा तपास..हा घटनाक्रम पोलिसांनाही थक्क करून गेला.

कराडला जातो म्हणून निघालेला उदयभान पाल आठवडाभरानंतरही न परतल्याने त्याच्या पत्नीने २३ जून रोजी घाटकोपर पोलीस ठाणं गाठलं. पण त्यानंतरही महिनाभर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण उदयभानचा काहीच पत्ता लागेना. अशात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन जगदाळे यांना सोपवलं. गुन्हे अन्वेषणातील तगडा अनुभव गाठीशी असलेल्या जगदाळेंनी तपास सुरू केला.

सुरुवात मोबाइल फोनआधारे तांत्रिक तपासाने झाली. आल्या-गेल्या कॉल्सचा अभ्यास करता उदयभान मांडूळ पकडणाऱ्या फासेपारध्यांच्या संपर्कात होता ही माहिती पुढे आली आणि तपासचक्राने वेग घेतला. जगदाळेंनी धुळे, जळगाव येथील फासेपारध्यांच्या वस्त्यांकडे मोर्चा वळवला. उपरा शिरला तर पहिल्यांदा वस्तीतल्या बायका त्याला सामोऱ्या जातात. हाती येईल ते फेकून पळवून लावतात किंवा कपडे फाडून आळ घेतात. त्यामुळे स्थानिक पोलीसही तेथली फेरी टाळतात. मुंबईहून त्या वस्तीत गेलेल्या जगदाळेंचा अनुभव वेगळा नव्हता. हाती काहीच लागलं नव्हतं म्हणून ते कराडला गेले. उदयभान कराडच्या प्रदीप सुर्वे या व्यावसायिकाच्या संपर्कात होता. उदयभान माझा मित्र आहे, कराडला वरचेवर येतो. मी त्याची राहण्याची व्यवस्था करतो. जूनमध्ये आला होता आणि निघून गेला. पण कुठे गेला हे माहीत नाही, असं सांगून सुर्वेने हात वर केले.

मांडूळ किंवा दुतोंडय़ा सापासोबत बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. तो घरी ठेवला की भरभराट होते, पैशांचा पाऊस पडतो, लक्ष्मी वास करते वगैरे वगैरे. अंधश्रद्धाळू श्रीमंतांना कोटय़वधी रुपयांना मांडूळ विकले जातात. या अवैध व्यवहारांतले बारकावे जगदाळेंना माहीत होते. पण या साखळीत उदयभानची नेमकी भूमिका समजून घेणं महत्त्वाचं होतं. तो मांडुळाच्याच नादात बेपत्ता झाला असावा, त्याचं अपहरण असावं किंवा त्याची हत्याही झाली असावी, तपासचक्र वेगाने वाहत होतं.

यादरम्यान १८ जूनला बंद झालेला उदयभानचा मोबाइल २० जूनला कराडला सुरू झाला. तो तीन ते चार दिवस कर्नाटकच्या विविध शहरांमध्ये फिरला आणि बंद पडला. या माहितीवर पोलीस आठवडाभर कर्नाटकमध्ये निर्थक गुंतून पडले. उदयभानचा फोन महिन्याभराने पुन्हा सुरू झाला होता. त्यातलं सीमकार्ड मात्र वेगळं होतं. हा मोबाईल सध्या रायगडच्या माणगाव भागात आहे, ही माहिती जगदाळे यांना मिळाली. माणगाव येथून मोबाइल वापरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं. तो कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रेलरचा चालक होता. त्याला जून महिन्यात ट्रेलरवरील लोखंडी मालाभोवती घातलेल्या ताडपत्रीत खोचलेला मोबाइल सापडला होता. आयता सापडलेला हा मोबाइल त्याने महिनाभर बंद ठेवून, स्वत:चं सीम घालून सुरू केला होता.

हाताशी आलेलं पुन्हा निसटल्याने पोलिसांनी जळगाव-धुळयाचा दौरा आखला. यंदा फासेपारध्यांच्या वस्त्या टाळून स्थानिक पोलीस ठाण्यात मांडूळ तस्करीत अटक झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्याचा त्यांचा बेत होता. या प्रयत्नांत त्यांच्या हाती नेमका दुवा लागला. त्याआधारे उदयभानची मांडुळांच्या अवैध खरेदी-विक्री व्यवसायात ‘चेकर’ अशी ओळख होती, हे सर्वप्रथम पोलिसांना समजलं. श्रीमंत ग्राहक गळाला लागलं की उदयभान डॉक्टर म्हणून वजन, लांबीनुसार मांडुळाची अंदाजे किंमत (लाखांतली) ठरवत होता. उदयभानने कराडची एक बख्खळ श्रीमंत पार्टी पकडलीये. प्रदीप सुर्वे..त्या पार्टीचं नाव. माहिती देणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला. कारण याच पथकाने सुर्वेची कराडला जाऊन चौकशी केली होती.

ठाण्यातल्या पत्त्यांच्या क्लबमध्ये अंगावर ‘पच्चास तोला’ सोनं मिरवणारं सावज उदयभानने अलगद हेरलं. फासेपारध्यांकडून २० ते २५ लाखांना मांडूळ विकत घ्या. माझ्याकडे एक ‘पार्टी’ तयार आहे. कमीतकमी एक कोटीला मांडुळाचा सौदा होईल. बसल्या जागी ७५ ते ८० लाखांचा फायदा होईल. लालसावल्या सुर्वेला सौदा पटला. सुर्वेने १९ लाखांना मांडूळ विकत घेतला. नाशिकला थांबलेल्या उदयभानच्या पार्टीला तो लगोलग विकायचा होता. मात्र नाशिक गाठेपर्यंत मांडूळ मेलं. सुर्वेने दोनेक वर्षांत हा अनुभव तीन ते चार वेळा घेतला होता. त्यापोटी त्याचे लाखो रुपये बुडाले होते.

या नेमक्या माहितीआधारे जगदाळे यांनी तांत्रिक तपासाद्वारे सुर्वेचा १६ ते १८ जून दरम्यानचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याच्या नोकराचा मोबाइल १८ जूनच्या संध्याकाळी कुंभार्ली घाटात सुरू होता, ही पुसटशी माहिती मिळाली. त्याआधारे कुंभार्ली घाटाजवळील पोलीस ठाणं गाठलं. तेथे २५ जूनच्या आसपास एक कुजलेला मृतदेह सापडल्याची नोंद होती. तो मृतदेह उदयभानचाच होता. लगोलग त्यांनी कराड गाठून सुर्वेसह त्याच्या नोकराला ताब्यात घेतलं. सुर्वेने जे सांगितलं ते थक्क करणारं होतं. उदयभानने मांडूळ खरेदी करण्यास भाग पाडलं. प्रत्येक वेळी मांडूळ थोडय़ा वेळातच दगावत होतं. लाखो रुपये बसल्या जागी कमावण्याच्या नादात नुकसान माझं होत होतं. प्रत्यक्षात ते पुढे विकत घेणारं कोणीही नव्हतं, तो उदयभानने मला फसवण्यासाठीच निर्माण केलेला आभास होता. याचा जाब विचारण्यासाठी मारहाण केली. त्यात तो ठार झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर त्याचा मोबाइल दक्षिण भारतात जाणाऱ्या ट्रेलरमध्ये दडवला.

उदयभान कराडला नेहमीच्या वाहनचालकासोबत गेला होता. सुर्वेने चालकालाही ठार करण्याचा बेत आखला. मात्र गयावया करू लागल्याने सुर्वेने त्याला सोडलं. पण त्याआधी त्याला उदयभानचा मृतदेह दाखवला. कुंभार्ली घाटात तो फेकेपर्यंत चालकाला सोबत ठेवलं होतं. मुंबईत परतलेल्या चालकाने आधीच तोंड उघडलं असतं तर कदाचित चुटकीसरशी हे गूढ उकललं असतं. घाटकोपर पोलिसांनी पुढल्या तपासासाठी चारही आरोपींना कराड पोलिसांच्या हवाली केलं आहे.