ठाणे महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती रवी फाटक यांचा मुलगा प्रणय याला (१८) त्याच्या मैत्रिणीच्या भावाने आणि वडिलांनी बेदम मारहाण केली. मुलुंड कॉलनी येथे ही घटना घडली.  सोमवारी संध्याकाळी प्रणय आपल्या १७ वर्षांच्या मैत्रिणीला मुलुंडच्या कालिदास सभागृहाजवळ भेटला होता. त्यावेळी तेथे तिचा भाऊ विकास छोटलानी याने या दोघांना एकत्र पाहिले. संतापून त्याने तिला आपल्याबरोबर नेले. नंतर त्याने प्रणयला मुलुंड कॉलनीजवळ  भेटायला बोलावले. प्रणय गेल्यावर तिथे विकास, त्याचे वडील अतुल छोटलानी तसेच त्यांच्या साथीदारांनी प्रणयला बांबूने मारहाण केली. तेथून सुटका करून पळून जाणाऱ्या प्रणयच्या गाडीचा विकासने आपल्या गाडीने पाठलाग करून त्याच्या गाडीला ठोकले. प्रणय याच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे पिता-पुत्र या घटनेनंतर फरारी झाले आहेत.