मूलभूत तंत्रज्ञान, व्यवसाय आणि संशोधनाच्या माध्यमातून आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षक व उद्योगजगत यांना एकत्र आणण्याकरिता मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) माजी विद्यार्थी संघटनेने आणखी एक पुढाकार घेतला आहे. या तीन गोष्टींचा संगम साधण्याकरिता ‘ग्लोबल बिझनेस फोरम’ स्थापून याद्वारे आयआयटीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि आयआयटीचे प्राध्यापक प्रा. डी. बी. फाटक, अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, मास्टेक लिमिटेडचे संस्थापक अशंक देसाई यांच्यासमवेत या फोरमची घोषणा मुंबईत केली. परिवर्तनाच्या प्रक्रियेत असलेल्या भारताला या उपक्रमामुळे अनेक आव्हानांचा सामना करण्याचे बळ मिळेल, अशी अपेक्षा पर्रिकर यांनी व्यक्त केली. यात १३ देश, २०० उद्योग, ५० जागतिक तज्ज्ञ यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. जागतिक, प्रादेशिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांच्या प्रक्रियांना एकत्र आणून त्यांना चालना देणे व त्यात एकात्मकता आणणे हे या फोरमचे उद्दिष्ट असणार आहे. फोरमचे पहिले अधिवेशन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान गोव्याला आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी विविध देशांमधील १५०० प्रतिनिधी सहभागी होतील.
अलीकडच्या काळात विकास हा फक्त सरकारी जबाबदारी ठरते आहे. आपल्याला हे चित्र बदलावे लागेल, अशी अपेक्षा प्रा. फाटक यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global business forum setup in mumbai
First published on: 12-04-2015 at 03:53 IST