कोकणभूमी नेहमी सगळ्यांनाच साद घालत असते. हिरव्यागर्द नारळी-पोफळीच्या, आमराईच्या बागा, अथांग समुद्र किनारे त्यावर हेलकावे घेणारे शिडाच्या होडया, कोकणातील कला-संस्कृती आणि ती शिताफीने जतन करून ठेवणारा कोकणी माणूस अशी एक ना अनेक विशेषणं कोकणाला आपल्याला लावता येईल.
कोकणातील डोंगर दऱ्या, नदया किल्ले आणि भव्य समुद्र किनारा तसेच कोकणातील कला सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात जाण्याची गरज नाही, तर कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ग्लोबल कोकण महोत्सवात ” या सौंदर्याचा अनुभव घेता येईल. “ग्लोबल कोंकण महोत्सव” मुंबईत गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेक्स् ग्राऊंडवर, ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
या ग्राऊंडवर भव्य कला दालन उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या कोकणातील प्रथितयश चित्रकारांची वैशिष्टयपूर्ण कलाकृतींचे प्रदर्शन या दालनात भरवण्यात येणार आहे. तसेच कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना या कला दालनात आपली कला प्रदर्शन करण्याची संधी ग्लोबल कोकण महोत्सवाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच या कला दालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली चित्रे व शिल्पे विक्रीसाठीही उपलब्ध कण्यात आलेली आहे.
या महोत्सवामध्ये कलाकृतींच्या प्रदर्शनासोबत स्पर्धाही भरवण्यात येणार आहेत. हे यंदाच्या ग्लोबल कोकणचं खास वैशिष्टय असणार आहे. ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये आंतरमहाविद्यालयीन ग्रुप चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी तीन ते पाच विद्यार्थ्यांच्या ग्रुपने १० x १० च्या कॅनव्हासवर कोकण या विषयावर चित्र काढून कोकण भूमी प्रतिष्ठानच्या कार्यालयात २७ एप्रिल २०१५ पर्यंत आणून दयावेत असे आवाहन “ग्लोबल कोकण महोत्सवा” चे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव यांनी केले आहे.
कोकणचा निसर्ग, संस्कृती, लोककला, उत्सव, कोकणातील जीवनशैली आणि खाद्य संस्कृती या विषयावर छायाचित्र व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कोकणचं निसर्ग सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन ग्लोबल कोकण महोत्सवात करण्यात आले आहे. या तीनही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकास १५००० रु., द्वितीय क्रमांकास १०००० रु. आणि तृतीय क्रमांकास ५००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. कोकणचं निसर्ग वैभव जगासमोर यावं हा या स्पर्धांमागील प्रमुख उद्देश आहे.
नवोदित कलाकारांच्या चित्रांची विक्री व्हावी म्हणून ५००० स्क्वे.फूट आकाराची आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. कलाकारांनी आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचवण्याची ही अनोखी संधी ग्लोबल कोकणच्या आयोजकांनी उपलब्ध केली आहे. नवोदित कलाकारांसाठी कलादालनात पॅनेल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कलाकारांनी संपर्क करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global konkan mahotsav
First published on: 28-04-2015 at 01:56 IST