कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोगलगाय म्हटले की, लगेच आपल्या डोळय़ांसमोर झाडांवर, मातीत आणि समुद्राच्या वाळूत चालणारा, शंखासारखे कवच असलेला प्राणी येते. गोगलगायीच्या अनेक प्रजाती या कवच नसलेल्याही असतात. सागरी जीवसृष्टीतील गोगलगाय हा अविभाज्य घटक आहे. कवच नसलेल्या गोगलगायींना इंग्रजीत ‘स्लग’ आणि कवच असलेल्या गोगलगायींना ‘स्नेल’ म्हणतात. समुद्राप्रमाणेच गोडय़ा पाण्याच्या ठिकाणीही गोगलगायींचे अस्तित्व असते. तळे, नदी, आणि जमिनीवर त्या दिसतात. साधारणपणे गोल किंवा मोठय़ा शंखातील आपल्याला सगळीकडे दिसणाऱ्या गोगलगायी या गोडय़ा पाण्यातील असतात. जमिनीवरील गोगलगायींच्या तुलनेत समुद्री गोगलगायींच्या प्रजातींची संख्या तुलनेने जास्त आहे.

मुंबईच्या किनारपट्टी भागात अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. मुंबईच्या समुद्रात ५५० हून अधिक लहान-मोठे समुद्री जीव आढळतात. त्यात ४० हून अधिक समुद्री गोगलगायींच्या प्रजातींची नोंद आहे. त्यापैकीच एक ‘बॉम्बेयाना’ ही गोगलगाय. मुंबईत सर्वात प्रथम ‘ग्लॉसोडोरिस बॉम्बेयाना’ या गोगलगायीचा शोध १९४६ साली समुद्री अभ्यासक विंकवर्थ यांनी लावला. त्यानंतर या गोगलगायीचे अस्तित्व सर्वाना ज्ञात झाले. ही गोगलगाय मुंबईत सापडल्याने तिचे नामकरण ‘बॉम्बेयाना’ असे करण्यात आले. मात्र १९४६ सालानंतर ही गोगलगाय पुन्हा मुंबईकरांना दिसली नाही. परंतु, तब्बल ७ दशकांनी म्हणजे २०१८ साली ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या संस्थेच्या अभ्यासकांना हाजीअली समुद्र किनाऱ्याच्या परिसरात ‘बॉम्बेयाना’ ही समुद्री गोगलगाय आढळून आली.

 मुंबईत मोठय़ा कालावधीनंतर किनाऱ्यांवरील सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणाचे काम सुरू असताना समुद्री गोगलगायीसारख्या छोटय़ा जीवांचे पुन्हा दर्शन घडले. समुद्र किनारी भागात विकासात्मक प्रकल्प सुरू असताना देखील आताही या गोगलगायीचे अस्तित्व दिसून येत आहे. ही प्रजाती समुद्र किनाऱ्यालगत खडकाळ किनाऱ्यावरील उथळ पाण्यात आढळते. या गोगलगायीचे शरीर अर्धपारदर्शक पांढऱ्या आवरणाचे असते. तिचा मूळ रंग पिवळट पांढरा असतो. त्याची चकाकी हे तिचे एक वैशिष्टय़. साधारण ४ मिमी ते १६ मिमी आकार असणाऱ्या या गोगलगायीच्या शरीराची कडा आकर्षक केशरी रंगाची असते आणि शरीरावर जांभळय़ा रंगाचे ठिपके असतात. श्वसनेंद्रियांवर चंदेरी ठिपके असतात. पाय आखूड असतात. मृदू शरीर, विविध रंग, चमकदारपणा यामुळे ही गोगलगाय आकर्षक दिसते. ‘बॉम्बेयाना’ मुंबईसह रत्नागिरी, रायगड, गोवा आणि गुजरातच्या किनाऱ्यांवरही आढळते. नोव्हेंबर ते मार्च हा समुद्री शेवाळ, स्पाँज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समद्री गोगलगायी उपजीविकेसाठी येतात. त्यामुळे हा काळात या गोगलगायी दिसून येतात. हाजीअली, कार्टर रोड, बॅण्डस्टँड, वसई येथे या गोगलगायी आढळून येतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यासह गुजरातमध्ये आढळणारी ही दुर्मीळ प्रजाती असल्याची नोंद ‘सी स्लग ऑफ इंडिया’ या पुस्तकात करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goniobranchus bombayanus spotted in mumbai mumbai print news zws
First published on: 14-03-2023 at 03:02 IST