मुंबई : Old Pension Scheme protest जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी बेमुदत संपात सहभागी झालेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. संप काळातील अनुपस्थितीचे असाधारण रजेत रुपांतर करण्यात आले असून सेवेत खंड पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी १४ ते २० मार्च या काळात बंद पुकारला होता. राज्य सरकारने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. राज्य सरकारने निवृत्तीवेतनाबाबत समिती स्थापन केल्यानंतर तडजोड करत संप मागे घेण्यात आला. त्यानंतर संपकाळातील अनुपस्थितीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सरकारनेच संप काळातील अनुपस्थिती हा सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करुन संपकरी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.