पदवीच्या विद्यार्थ्यांवर आता कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाचे बंधन

विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदी टप्प्याटप्प्याने लागू करण्यास केंद्रीय शिक्षण विभागाने सुरुवात केली असून सर्व विषयांतील पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागणार आहे.

सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पदवी स्तरावरील व्यावसायिक विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांसाठीच आंतरवासिता (इंटर्न) बंधनकारक आहे. पण आता पारंपरिक विद्याशाखांसह सर्व विद्याशाखांच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासितेची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. विद्यापीठे किंवा शिक्षणसंस्थांनी उद्योग, संशोधनसंस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आंतरवासितेची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. नियमित वेळापत्रकानुसार आवश्यक विषयांना धक्का न लावता एका सत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी संस्थांनी उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षणसंस्थेच्या आवारात ही संधी असू नये. विद्यार्थ्यांना कंपन्या किंवा प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी द्यावी, असेही आयोगाने नमूद केले आहे. विद्यापीठांनी त्यांचा अभ्यासक्रम, विषय रचना यात आवश्यक बदल केल्यानंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या तुकडीपासून त्या विद्यापीठात ही नवी रचना लागू करण्यात येईल. नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षण हक्क धोरणातही पदवी स्तरापासून आंतरवासिता, संशोधन या मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे.

आयोग म्हणतो..

‘काही विद्याशाखांची ओळख ही फक्त शैक्षणिक बाबींपुरतीच मर्यादित असल्याचे दिसते. या अभ्यासक्रमातील पदवीधरांना नोकऱ्या मिळत नाहीत. काही अभ्यासक्रम हे फक्त शैक्षणिक असल्याचा दृष्टिकोन बदलून विद्यार्थी रोजगारक्षम व्हावेत, उद्योगांची गरज शिक्षणसंस्थांना कळावी आणि काही विद्याशाखांशी उद्योग क्षेत्र बांधले जावे यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे,’ असे आयोगाने नमूद केले आहे.

यातील अडचण काय?

सद्य:स्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे बंधनकारक आहे. विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना काही विद्यापीठांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे बंधनकारक आहे. मात्र, यातील बहुतेक विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांमध्ये काही दिवस पूर्ण करतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही इंटर्नशिप मिळवण्यासाठी सध्या सायास करावे लागतात. अशा परिस्थितीत कला, वाणिज्य शाखेच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप कुठे मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंतरवासिता कशी असेल

– सध्या पारंपरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतील पदवी अभ्यासक्रमांसाठीही इंटर्नशिप असेल

– श्रेयांक पद्धतीत पदवी अभ्यासक्रमाच्या १३२ श्रेयांकापैकी २० टक्के श्रेयांक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी असतील

– एकूण सर्व श्रेयांकापैकी २४ श्रेयांक हे ज्या विषयातील पदवी घ्यायची त्यातील मुख्य विषयांसाठी असणे अपेक्षित आहे

– प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेले विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील

– विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी शिक्षणसंस्थांनी उद्योग संस्थांचे सहकार्य घेणे अपेक्षित आहे

– विद्यार्थी शिकत असलेले विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेच्या आवारात केलेले काम इंटर्नशिप म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार नाही

– संस्था शेवटचे सत्र इंटर्नशिपसाठी राखीव ठेवू शकतील

– प्रशिक्षण मंडळ (बीओएटी), कौशल्य विकास केंद्र, शासनाचा कौशल्य विकास कार्यक्रम यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी देता येऊ शकेल

‘शिक्षणसंस्थांनी टप्प्याटप्प्याने बदल अवलंबायचे आहेत. अगदी समाजशास्त्र, मानवविज्ञान यांसारख्या विषयांतील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थीची उद्योगांना आवश्यकता असते. त्याशिवायही अनेक संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळू शकतो. शिक्षणसंस्थांनी या संधी शोधून विद्यार्थ्यांना त्या देणे अपेक्षित आहे.’

– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Graduate students are now required to undergo training in companies zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या