मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाने ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला ठाणे जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रंथालय मित्र मंडळाचा विस्तार पुढे संपूर्ण राज्यभरात केला जाणार आहे.
मोबाईल आणि इंटरनेटच्या सध्याच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड केली जाते. त्या पाश्र्वभूमीवर केवळ नकारात्मक सूर लावत बसण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी तसेच अमेरिकेतील ‘फ्रेंड्स ऑफ लायब्ररी’च्या धर्तीवर ही चळवळ सुरू करण्याचे ग्रंथसंग्रहालयाने ठरवले आहे.
साहित्यप्रेमी, चोखंदळ वाचक, ग्रंथविक्रेते, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथालये आदी सर्व घटकांना बरोबर घेऊन डोंबिवली ग्रंथसंग्रहालय हा आगळा उपक्रम सुरू करणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. हे विद्यार्थीच उद्याचे वाचक असणार आहेत. वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही भावी पिढी करणार आहे आणि त्यासाठीच ग्रंथसंग्रहालयाचे सुधीर बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे.
सुरुवातीला हा उपक्रम ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आदी शहरांपुरता मर्यादित ठेवण्यात येणार असून पुढे संपूर्ण राज्यभरात सुरू केला जाणार आहे. ग्रंथालय मित्र मंडळाची स्थापना आणि पूर्वतयारीसाठी नुकतीच एक बैठकही डोंबिवलीत आयोजित करण्यात आली होती. यासंदर्भात पुढील बैठक २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या वर, रेल्वेस्थानकासमोर, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी बडे यांच्याशी ९३२१४३१५४८ या क्रमांकावर किंवा ेिॠ१ंल्ल३ँ@ॠें्र’.ूे या मेल आयडीवर संपर्क साधावा.