केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबईतील तिसऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला बुधवारी मंजुरी दिल्याने दक्षिण मुंबईतील आर्थिक केंद्र असलेल्या कुलाब्यापासून अंधेरीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या ‘सीप्झ’पर्यंत ३३ किलोमीटर लांबीचा पट्टा मेट्रो रेल्वेने जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो रेल्वे भुयारी मार्गाने धावणार असून मुंबईला जागतिक वित्त केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा मेट्रो रेल्वे मार्ग आखण्यात आला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांनीही मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.
कुलाबा ते वांद्रे हा तिसऱ्या मेट्रो रेल्वेचा मूळ २० किलोमीटर लांबीचा नियोजित मार्ग होता. नंतर तो वाढवत थेट सीप्झपर्यंत नेण्याचे ठरले.
त्यानुसार ही तिसरी भुयारी मेट्रो रेल्वे कुलाबा-नरिमन पॉइंटर, वांद्रा-कुर्ला संकुल, अंधेरी औद्योगिक वसाहत आणि सीप्झ या व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळही या मेट्रोच्या मार्गावर असणार आहेत. या मेट्रो रेल्वेला आठ डबे असतील आणि दर तीन मिनिटांना एक गाडी सुटेल असे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २४ हजार ४३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत ‘जापनिज इंटरनॅशनक कोऑपरेशन एजन्सी’ अर्थात ‘जायका’ने सहमती दर्शवली आहे.
प्रकल्प खर्चाच्या २४ हजार कोटी रुपयांपैकी चार हजार कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ तर चार हजार कोटी रुपये केंद्र सरकार भागभांडवल म्हणून गुंतवतील. मुंबई विमानतळ चालवणाऱ्यांकडून ७५० कोटी रुपये घेण्यात येतील. तर ‘जायका’कडून साडे बारा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळेल अशी ढोबळ आर्थिक रचना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘मेट्रो-३’ ची वैशिष्टय़े

*    भुयारी मार्गाने जाणारी मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे
*    एकूण २७ स्थानके
*    दर तीन मिनिटांनी एक गाडी
*    सन २०१९-२० पर्यंत काम पूर्ण
* सन २०२१ पासून वर्षांला १३ लाख ९० हजार प्रवासी तिसऱ्या मेट्रोचा लाभ घेणार
* सध्या रेल्वेमार्गाशी जोडले न गेलेले काळबादेवी, वरळी, प्रभादेवी हे पट्टेही मेट्रो मार्गाने जोडले जाणार

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green signal to mumbais third metro
First published on: 28-06-2013 at 03:39 IST