या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न?

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या वादात कन्हैयाकुमार हे नाव देशभर गाजले. सध्या दिल्ली विद्यापीठातील रामजस महाविद्यालयात सुरू असलेल्या वादात कारगिल युद्धातील शहीद लष्करी अधिकाऱ्याची मुलगी गुरमेहर कौर हे नाव सध्या असेच गाजत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये मतांच्या ध्रुवीकरणासाठी सत्ताधारी भाजपकडून या वादाचा राजकीय लाभ उठविण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे.

गेल्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित देशविरोधी घोषणांचा वाद निर्माण झाला होता. त्यावरून देशभर राष्ट्रभक्ती विरुद्ध राष्ट्रद्रोही असा रंग देऊन वाद पेटविण्यात आला. देशभक्तीच्या मुद्दय़ावर भाजपने वातावरणनिर्मिती केली होती. आसामच्या निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला होता. पश्चिम बंगालमध्येही देशभक्तीच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला होता. आसाममध्ये भाजपला सत्ता तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या संख्याबळात वाढ झाली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादात कन्हैयाकुमार याला न्यायालयात नेताना मारहाण करण्यात आली होती. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या वादातून कन्हैयाकुमार याचे नेतृत्व पुढे आले. देशभर कन्हैयाकुमारचे कौतुक झाले. तुरुंगातून सुटल्यावर त्याने केलेले भाषण गाजले होते. डावे पक्ष, काँग्रेस, नितीशकुमार आदींनी कन्हैयाचे समर्थन केले होते.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने जाणीवपूर्वक मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू केला आहे. शेवटच्या टप्प्यात समाजवादी पार्टी, काँग्रेस व बसपाचा ‘कसाब’ असा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला उल्लेख, प्रत्येक गावांमध्ये कबरस्तानच का, स्मशानभूमी का नाही किंवा कानपूर रेल्वे घातपातामागे पाकिस्तानचा हात आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला. हा सारा वाद सुरू असतानाच शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये आझादी किंवा देशभक्तीचा मुद्दा पुन्हा पुढे करण्यात आला.

रामजस महाविद्यालयीतील वादात कारगिल युद्धातील शहीद लष्करी अधिकाऱ्याची मुलगी गुरमेहर कौर हिने समाजमाध्यमांतून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने तिला लक्ष्य केल्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरमेहरची बाजू उचलून धरली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurmehar kaur kanhaiya kumar delhi university abvp
First published on: 28-02-2017 at 03:01 IST