दहिसर पश्चिमेला रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकचा धोकादायक भाग पालिकेने गुरुवारी काढून टाकला. गेल्या वर्षभरापासून हा स्कायवॉक नादुरुस्त असून रहदारीसाठी बंद आहे. मात्र या स्कायवॉकचा काही भाग खिळखिळा झाल्याने तो पडून दुर्घटना होण्याची भीती होती.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी या पुलाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी, यसाठी पालिकेच्या आर उत्तर विभागाने एमएचबी पोलीस ठाण्याला पत्र दिले. स्कायवॉक बंद असतानाही तेथे गर्दुले आणि बेघरांनी आश्रय घेतला होता.

शुक्रवारी पुलाचा आणखी काही भाग धोकादायक अवस्थेत आढळून आला. त्यामुळे तो भाग पालिकेकडून पाडण्यात आला. सदर स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी निविदा निघाल्या नसल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे.

या स्कायवॉकच्या धोकादायक अवस्थेबाबत ‘लोकसत्ता’ मुंबई सहदैनिकातही वृत्त प्रकाशित झाले होते.

स्कायवॉकचा काही भाग गुरुवारी रात्री पडला होता. शुक्रवारी तो भाग अधिक धोकादायक अवस्थेत आढळून आला. स्थानक परिसरात मोठय़ा संख्येने वर्दळ असते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने स्कायवॉकचा भाग पालिकेकडून पाडण्यात आला आहे.

– संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर उत्तर पालिका विभाग