१२ डब्यांची पहिली गाडी शुक्रवारी धावणार; सध्या दिवसभरात १४ फेऱ्या
डॉकयार्ड रोड आणि वडाळा या स्थानकांतील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रेंगाळलेला हार्बर मार्गावरील १२ डब्यांचा प्रकल्प आता अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी हार्बर मार्गावरील पहिली १२ डब्यांची गाडी धावणार आहे. सध्या या एकाच गाडीच्या माध्यमातून हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या १४ सेवा चालवल्या जातील. यापैकी किमान चार सेवा गर्दीच्या वेळेत चालवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला आहे. जसजशा नव्या गाडय़ा येत जातील, तशा १२ डब्यांच्या गाडय़ांची व फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता वाशीहून ही पहिली १२ डब्यांची गाडी वडाळ्यासाठी निघेल.
हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी चालवण्याचा प्रकल्प २०१४मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र डॉकयार्ड रोड, रे रोड, वडाळा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या चार स्थानकांतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणात अडथळे येत असल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला. त्याचप्रमाणे या मार्गावर ९ ऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी डब्यांची कमतरता होती. आता बंबार्डिअर गाडय़ा पश्चिम रेल्वेवर येत असून तेथील सिमेन्स गाडय़ा मध्य रेल्वेवर येत आहेत. त्यामुळे डब्यांची ही कमतरता दूर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नुकतीच या मार्गावर १२ डब्यांच्या गाडीची चाचणीही घेण्यात आली होती. या चाचणीदरम्यान वडाळा आणि डॉकयार्ड रोड येथे काही प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची गरज भासली होती. त्यामुळे हा प्रकल्प आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत होती.
मात्र मध्य रेल्वेने या सर्व अडचणी दूर करत शुक्रवारपासून हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक गाडी दिवसभरात १४ फेऱ्या करणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी वहन क्षमता ३३ टक्क्य़ांनी वाढणार आहे. डबे उपलब्ध होतील, तशा उर्वरित गाडय़ाही १२ डब्यांच्या चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line 12 coach trains
First published on: 28-04-2016 at 00:45 IST