एकापेक्षा अधिक घटकांच्या मिश्रणातून तयार केलेल्या ३२८ औषधांवर (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर अनेक औषध कंपन्यांनी ही औषधे बाजारातून परत मागविण्यास सुरुवात केली. आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाने या औषधांवर बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिजैविकांचा वाढता वापर आणि एकापेक्षा अधिक घटक असलेल्या औषधांचा मारा यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध जलदगतीने वाढत आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या या औषधांचे दुष्परिणाम दिसून येत असल्याने केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने मार्च २०१६ मध्ये ३४४ औषधांची निर्मिती, विक्री आणि वितरणावर औषधे व सौर्दयप्रसाधने नियम १९४० च्या २६(अ) कलमा अनुसार बंदी घालण्याबाबतचा अधिनियम जारी केला होता. औषध नियंत्रकाच्या निर्णयाने औषधनिर्मिती कंपन्यांना दणका बसल्याने त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने या औषधांचा अभ्यास करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये औषध तंत्र सल्लागार मंडळाची (ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) स्थापना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थापन झालेल्या या मंडळाने औषधांचा अभ्यास करून ३२८ औषधांमध्ये एकापेक्षा अधिक घटक एकत्रित करण्यामागील कोणतेही योग्य कारण आढळले नसल्याचा निष्कर्ष काढला. तसेच ही औषधे मानवी शरीरासाठी घातकही ठरू शकतात, असाही निष्कर्ष अहवालात काढण्यात आला.

याआधी केंद्रीय औषध नियंत्रक विभागानेही वैद्यकीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून या औषधांचे परीक्षण केले होते. या समितीनेही ही औषधे वैद्यकीयदृष्टय़ा घातक असल्याचा इशारा दिला होता. वैद्यकीय समिती आणि औषध तंत्र सल्लागार मंडळ या दोन्हींच्या अहवालाची दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाने औषधे व सौर्दयप्रसाधने नियम १९४०च्या २६(अ) कलमाअंतर्गत ३२८ औषधांची निर्मिती, विक्री आणि वितरणावर देशभरात बंदी घातली आहे. औषध नियंत्रक विभागाने सूचित केलेल्या ३४४ औषधांपैकी १५ औषधांची निर्मिती आणि वितरण १९८८ पासून केले जात असल्याचा दावा औषधनिर्मिती कंपन्यांनी केला. त्यामुळे सध्या या औषधांना अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे.

ताप उतरतो, पण अवयवांना धोका

डेंग्यूमध्ये ताप येत असल्याने पॅरासिटामोल हे औषधे घेणे योग्य असते. परंतु बाजारात मिळणाऱ्या औषधांमध्ये पॅरासिटामोलसह वेदनाशामके आणि प्रतिजैविके एकत्रित असतात. ती घेतल्यानंतर ताप झपाटय़ाने उतरत असला तरी त्याचे मूत्रपिंड आणि अन्य अवयवांवर दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक असतो. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या या ३२८ औषधांमध्ये ताप-सर्दीसाठी दिली जाणारी सारीडॉन, डी कोल्ड, त्वचेच्या व्याधीवर लावण्यात येणारी पॅनडर्म, मधुमेह नियंत्रक औषधांसह प्रतिजैविके असलेल्या औषधांचा समावेश आहे.

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन

एकापेक्षा अधिक घटक एकत्रित करून तयार केलेल्या औषधांना ‘फिक्सड डोस कॉम्बिनेशन’ असे म्हटले जाते. ही औषधे प्रमाणित नसल्याने ती घेतल्याने शरीरासाठी आवश्यक असलेला एखादा घटक कमी प्रमाणात जातो, तर एखादा घटकाचे प्रमाण गरजेपेक्षाही अधिक असते. ही औषधे घेतल्यास अनेकदा गरज नसूनही शरीराला आवश्यक अशा एखाद्या घटकासोबत अनावश्यक घटकही शरीरात जातात. ती घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होत होत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harmful medicine in india
First published on: 15-09-2018 at 01:13 IST