मुंबई : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे निरीक्षण ‘पीएमएलए’ न्यायालयाने नोंदवले असूनही ते सत्तेत आहेत. कारण ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपने केले असून ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, असे सरकारच बरखास्त करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे.
१२ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व सहा विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस लढणार असून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाची रावणाची प्रवृत्ती जागी झाल्याने त्यांना सर्वत्र रावण दिसतो, अशी टीका पटोले यांनी केली. भाजपने सत्तेत येण्यासाठी विविध जातीधर्मीयांना आरक्षण देण्याचा शब्द दिला. दोन वेळा केंद्रात आणि राज्यात सत्ता घेतली, परंतु आरक्षण मात्र दिले नाही, असा आरोप पटोले यांनी केला.