मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची सकाळ होताच दडी
पावसासाठी जय्यत तयारी केल्याचा पालिकेचा हरएक दावा मोडून पडत असून रात्री आलेल्या पावसाने दिवसाही शहराची दाणादाण उडवली. सोमवारी रात्री जोरदार वाऱ्यांसह सुरू झालेल्या पावसाने शहरभरातील शंभरहून अधिक झाडे मोडून पडली. दिंडोशी येथे दरड कोसळली तर पाच ठिकाणी घरे पडण्याच्या तक्रारी आल्या. अनेक भागांत पाणी साचल्याने सकाळी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती तर कुर्ला येथे पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या गोंधळाला सुरुवात झाली.
सोमवारी रात्री जोरदार वाऱ्यांसह मुंबईच्या सर्वच भागांत पाऊस पडला. पूर्व उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक होते. दक्षिण भागात ७४.५१ मिमी, पश्चिम उपनगरात ७४.५१ मिमी तर पूर्व उपनगरात ८०.२० मिमी पाऊस पडल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागातून सांगण्यात आले. हवामानशास्त्र विभागानुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या १२ तासांत सांताक्रूझ येथे १०७ मिमी तर कुलाबा येथे ८६ मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीच्या पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. मशीद, बापू खोटे रस्ता, भारतीय विद्या भवन टी, आंबेडकर नगर, पंत नगर, कुर्ला टर्मिनस, पश्चिाम द्रुतगती मार्गावर ओबेरॉय मॉलजवळ, वाकोला पूल परिसरात पाणी तुंबले होते. कुर्ला येथे पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली.
या पावसाने रात्री शहरात २८, पूर्व उपनगरात १८ तर पश्चिम उपनगरात १६ झाडे पडली. सकाळनंतर पावसाचा जोर ओसरला तरीही मंगळवारी दुपापर्यंत आणखी ४० झाडे पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. दिंडोशी येथे सहारा हॉटेलजवळ दरडीचा भाग कोसळून तरुण जखमी झाला. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात पाच ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्याही घटना घडल्या. काळबादेवी येथे नीलकमल हॉटेलसमोरील बैठे बांधकाम खचून त्यात अडकलेल्या हिरालाल शहा यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

पावसाचे       मोजमाप
कुलाबा         ९८ मिमी
भायखळा ११५ मिमी
दादर          ४० मिमी
धारावी   १५ मिमी
वडाळा  ५८ मिमी
वरळी      ७२ मिमी
कुर्ला     १३७ मिमी
अंधेरी   ८६ मिमी
मालाड  ४५ मिमी
दहिसर  १३६ मिमी
मुलुंड  ७३ मिमी
(मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांतील)