मुंबईः देवीच्या विसर्जनानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ पर्यंत मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने व शाळेच्या बसेगाड्या यातून वगळण्यात आल्या आहेत. यापूर्वी गणेश विसर्जनाच्या वेळीही चार दिवस मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.

बंदी आदेशातून भाजीपाला, दूध, पाव आणि बेकरी उत्पादनाची वाहतूक करणारी वाहने, पिण्याचे पाण्याचे टँकर, पेट्रोल, डिझेल व केरोसिनचे टँकर, रुग्णवाहिका, सरकारी वाहने, शाळेच्या बसगाड्या दसरा मेळाव्यासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत. वाहतूक विभागाचे उपायुक्त (मुख्यालय) राज तिलक रौशन यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले. करोनानंतर गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, आता करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रौत्सव साजरा होत आहे. त्यामुळे भाविकांमध्येही मोठा उत्साह आहे. देवीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच विसर्जनाच्या वेळी मुंबईत कोणत्या वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.