मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाने मुंबई विमानतळावर कारवाई करत सुमारे चार किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे २४ कोटी रुपये आहे. याप्रकरणी एनसीबीने एका दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक केली आहे.

जोहान्सबर्ग येथील रहिवासी असलेला आरोपी हा इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबईत आला होता. तो मुंबई विमानतळावर उतरताच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील लाल रंगाच्या बॅगची तपासणी केली असता आतील गुप्त कप्प्यात हेरॉईनची चार पाकिटे त्यांना दिसली. तीन किलो ९८० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले असून काळय़ा बाजारात त्याची किंमत २४ कोटी रुपये आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये, एनसीबी मुंबईने बुधवारी अंधेरी येथे छापा टाकून ५०८ ग्रॅम ट्रामाडॉल गोळय़ा जप्त केले. त्या अंधेरी येथून अमेरिकेला पाठविण्यात येणार होत्या. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.