दहीहंडीच्या उत्सवात गंभीर जखमी होणाऱ्या गोविंदांचे प्रमाण वाढत असून त्याबद्दल आयोजकांना जबाबदार धरुन गुन्हे दाखल करावेत आणि दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा आणून शासनाने भरपाई, सुरक्षिततेचे उपाय आदींसाठी र्निबध घालण्याची वेळ आता आली आहे. जखमी किंवा मरण पावलेल्यांना भरपाईची जबाबदारी कोणाची, त्याला कोण जबाबदार हे सरकार किंवा पोलिसांनी निश्चित केलेले नसल्यामुळेच उत्सवावर आणि दहीहंडीच्या उंचीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात सुमारे ४०० गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी काहीजण गंभीर आहेत. दरवर्षी हे प्रमाण वाढत असून कायमस्वरूपी अपंगत्व किंवा दुखापतीही होत आहेत. दरवर्षी हे होत असले, तरी याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने किंवा पोलिसांनी कोणतीही पावले टाकलेली नाहीत. लाखो रुपयांची बक्षीसे, तारे-तारकांची हजेरी यामुळे लवकर दहीहंडी फुटू नये, यासाठी ती अधिकाधिक उंचीवर नेण्याचे आयोजकांचे प्रयत्न असतात. वास्तविक मानवी मनोरा उभारणीच्या मर्यादा लक्षात घेऊन सात-आठ थरांपर्यंत किंवा ठराविक मीटपर्यंत दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत. उत्सवाला प्रत्येक पोलिस ठाण्याने परवानगी देताना आयोजकांकडून तसे हमीपत्र घेऊन आणि त्यापेक्षा अधिक उंचीवर हंडी बांधल्यास ती कमी करण्यासाठी कारवाई करण्याची गरज आहे.सुरक्षिततेसाठी जाळी लावणे, विमा, वैद्यकीय मदत आणि जखमींवरील वैद्यकीय उपचारांसह भरपाईची जबाबदारीही आयोजक आणि गोविंदा पथकावर टाकली गेली पाहिजे. त्यासाठी मुंबई पोलिस कायद्यातही आवश्यक तरतुदी केल्या गेल्या पाहिजेत. एखाद्या गोविंदाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही आयोजकांवर दाखल केला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी व्यक्त केले.गोविंदांच्या सुरक्षिततेचे उपाय करणे, गंभीर जखमी किंवा मरण पावल्यास भरपाईची जबाबदारी, दहीहंडीची उंची आदींबाबत शासनाने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी स्पष्ट केले.
उन्हाने गोविंदा बेजार..
मुंबई : उन्हाचा पारा आणि घामाच्या धारा लागल्याने गोविंदा पथके बेजार झाली होती. थर रचताना असह्य उकाडय़ाचे नवे संकट गोविंदांना सतावत होते. कडक उन्हाच्या तडाख्यात कमालीचा थकवा आल्यामुळे दुपारनंतर अनेक तरुणांनी गोविंदा पथकातून काढता पाय घेतल्याचे दिसून येत होते. दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाण्याविना पूर्ण होतच नाही. यंदा निम्म्या महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे भान राखून मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळला आणि उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या गोविंदांना पाण्यापासून वंचित राहावे लागले.