अक्षय मांडवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रे रोडजवळ अर्धमेल्या अवस्थेत आढळलेल्या पक्ष्याची आज सुटका

हिमालय पर्वतरांगांत आढळणाऱ्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले ‘हिमालयीन गिफ्रॉन’ जातीचे गिधाड आठ महिन्यांपूवी रे रोड येथे अर्धमेल्या अवस्थेत आढळले होते. एका हौशी पक्षिमित्राने या गिधाडाचा सांभाळ करून त्याच्यावर उपचार केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी वनविभागाच्या मदतीने या गिधाडाला नाशिकच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी पांढऱ्या पुठ्ठय़ाची, लांब चोचीची आणि पांढरी गिधाडे १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर महाराष्ट्रातील गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील  पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. परिणामी वाढते शहरीकरण आणि अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडेदेखील मुंबईतून हद्दपार झाल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक विजय अवसरे यांनी वर्तवली. मात्र प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारे आणि भारतातील  गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठे हिमालयीन ग्रिफॉन गिधाड फेब्रुवारी महिन्यात पक्षिमित्र प्रदीप डिसुजा यांना रे रोड  स्थानक परिसरात जखमी अवस्थेत सापडले होते. फोर्ट परिसरातील १०० वर्षे जुन्या क्वीन मेन्शन इमारतीच्या गच्छीवर डिसुजा यांनी आपल्या परिवाराच्या मदतीने पक्षी निवारा केंद्र उभारले आहे. या ठिकाणी मोठय़ा संख्येने घार, घुबड, वटवाघुळ पक्षी आसऱ्यास आहेत. लोखंडी पिंजऱ्याला डिसुजा यांनी खुले दार ठेवल्याने या पक्ष्यांना केव्हाही आकाशात भरारी मारण्याची मोकळीक मिळते. या ठिकाणी डिसुजा यांनी गिधाडावर आठ महिने त्याच्यावर उपचार केले.

‘विषबाधा आणि अपुऱ्या खाद्यामुळे हे गिधाड अशक्त झाले होते. मात्र, प्रतिजैविके आणि योग्य आहार यांच्या माध्यमातून त्याचा सांभाळ करण्यात आला. मध्यंतरी त्याच्या शरिरात जंतू निर्माण झाल्याने त्याची पिसे मोठय़ा प्रमाणात झडली. मात्र, आता हे गिधाड तंदुरुस्त झाले आहे,’ असे डिसुझा यांनी सांगितले.  बुधवारी वन विभागाच्या मदतीने गिधाडांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या हरसुळ जंगलात त्याची सुटका करण्यात येणार असल्याचे मुंबईचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले.

हिमालयीन ग्रिफॉन गिधाड मुंबईत आढळल्याचा योग दुर्मीळ असल्याचे ‘बीएनएचएच’च्या पक्षी अभ्यासक तुहिना कट्टी यांनी सांगितले. पक्षी स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे. यासाठी पक्ष्याच्या पायांवर विशिष्ट सांकेतिक क्रमांकाची किंवा प्रदेशानुरूप ठरलेल्या रंगाची रिंग लावली जाते; जेणेकरून भविष्यात हा पक्षी आढळ्यास रिंगवरील सांकेतिक क्रमांकानुसार त्याच्या स्थलांतराच्या पट्टय़ाची माहिती मिळेल, असे त्या म्हणाल्या.

दररोज अर्धा किलो मांसभक्षण

तीन फूट उंचीच्या या गिधाडाच्या पंखांचा व्यास सात फूट रुंद इतका आहे. अर्धमेल्या अवस्थेत सापडले तेव्हा या गिधाडाचे वजन साडेतीन किलो होते. मात्र, आता त्याचे वजन आठ किलोवर पोहोचले आहे. हा पक्षी दररोज अर्धा किलो म्हशीचे मांस भक्षण करतो, अशी माहिती डिसुझा यांनी दिली.

उत्तर भारतात आढळणाऱ्या या गिधांडाचा वावर साधारणपणे गुजरात आणि राजस्थान पर्यंत असतो. सध्या मुंबईत असलेले हिमालयीन ग्रिफॉन गिधाड हे पिल्लू असून ते या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेत आल्याची शक्यता आहे. त्यातही नाशिकमध्ये त्याची मुक्तता करण्यात येणार असल्याने ते पुन्हा मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

-अविनाश भगत, पक्षी अभ्यासक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himalayan vulture vision in mumbai
First published on: 10-10-2018 at 03:09 IST