मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला हवालदारच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. नवीन घर घेण्यासाठी पैसे आणावेत तसेच मामाच्या मुलीसोबत प्रेम संबंध असल्याने तो आपल्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
कळवा येथील घोलाईनगरमधील अपर्णाराज इमारतीत राहणाऱ्या अर्चना हिवरे (२३)हिने बुधवारी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून ती काम करीत होती. तिचा पती श्रीराम बाळासाहेब हिवरे हे सुद्धा पोलीस हवालदार असून ठाणे पोलिस आयुक्तालयातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे सहा महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याने श्रीराम हा अर्चनाला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करून तिचे एटीएम कार्ड स्वत: कडे ठेवून तिला खर्चासाठी पैसे देत होता, यातूनच तिने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. या प्रकरणी अर्चनाचा भाऊ अभिजीत मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्रीरामला अटक केली आहे.