अरविंद गुप्ता यांना ‘दधिची’ पुरस्कार प्रदान
कल्पना भारतात विकसित होतात आणि त्यावर अमेरिकेसारखे देश पैसा कमवितात हे रोखायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी अंबरनाथ येथील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात केले. त्यांच्या हस्ते संस्थेतर्फे दिला जाणारा ‘दधिची’ पुरस्कार यंदा कल्पक खेळण्यांद्वारे नव्या पिढीमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणारे अरविंद गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मुकुंद ठाकूरदेसाई यांना आचार्योत्तम तर विश्वनाथ पनवेलकर यांना अंबरनाथ भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बालपणी गरिबी असली तरी शाळेतले शिक्षक मनाने श्रीमंत होते. त्या संस्कारांचा पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. हळदीचे उपयोग परंपरेने भारतीयांना माहिती होते. मात्र त्याचे पेटंट अमेरिका घेऊ पाहत होती. त्यामुळे आपल्या भारतीय परंपरांचा आदर करण्याच्या हेतूने आपण त्यास विरोध केला आणि यशस्वी झालो, असेही त्यांनी भाषणात सांगितले.
देशाला सध्या मातीची नितांत गरज असून प्रत्येक भारतीयाने दररोज किमान एक मूठ माती निर्माण करावी, असे आवाहन अरविंद गुप्ता यांनी सत्कारास उत्तर देताना केले.
विलास देसाई, प्रा.भगवान चक्रदेव, डॉ. वैदेही दप्तरदार, डॉ. पूर्वा अष्टपुत्रे, संजय पानसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.