व्हिवा लाउंजमध्ये ‘आयएफएस’ अधिकारी

या कार्यक्रमात आयएफएस अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी उपस्थितांशी संवाद साधतील.

डॉ. स्वाती कुलकर्णी

 

डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याशी संवाद साधण्याची संधी

देशोदेशीच्या भारतीय दूतावासांत काम केलेल्या परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या नोकरीमधील नेमकी आव्हाने, संधी आणि अधिकार या विषयी जाणून घेण्याची संधी लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने मिळणार आहे. या कार्यक्रमात आयएफएस अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी उपस्थितांशी संवाद साधतील.

विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांना लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या मंचावर आमंत्रित करण्यात येते. या कार्यक्रमातून विविध क्षेत्रांतील यशस्विनींशी मुक्त संवाद साधण्यात येतो. या मंचावर प्रथमच परराष्ट्र सेवेतील अधिकारी येणार आहे. डॉ. स्वाती कुलकर्णी सध्या मुंबईतच विभागीय पारपत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिका, ओमान, ब्रिटन, मॉरिशस आणि स्पेनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयांमध्ये अधिकारपदावर काम केले आहे. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवल्यानंतर डॉ. स्वाती यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान पार करून परराष्ट्र सेवेतील करिअर संधी स्वीकारली.

मुंबईत येण्याअगोदर त्या दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनमध्ये भारताच्या कौन्सल जनरल (वाणिज्यदूत) म्हणून कार्यरत होत्या. मस्कतमध्ये भारतीय मिशनच्या उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात प्रथम सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. शिवाय ऑस्ट्रिया, सायप्रस, ग्रीस, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लँड, माल्टा, लिक्टेन्स्टाइन, पोर्तुगाल, आर्यलड आणि स्पेन या देशांतील उपसचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

दिल्लीत साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या अतिरिक्त स्वीयसचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्यातही पासपोर्ट ऑफिसर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

डॉ. स्वाती लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात प्रथम सचिव कार्यरत असताना त्या देशाने स्थलांतरितांसाठीचे नियम बदलले. त्याचा फटका तेथे वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना बसला. तेथील नोडल ऑफिसर म्हणून काम करताना डॉ. स्वाती यांनी ही परिस्थिती यशस्वीपणे हाताळून अनेक भारतीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.

स्पर्धा परीक्षांतून करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र सेवेतील पदाचे आकर्षण असते. सनदी सेवा आणि पोलीस सेवांएवढी माहिती मात्र या क्षेत्राविषयी नसते. परराष्ट्र सेवेतील करिअरविषयी त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम असतो.

परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याकडूनच देशातील या सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या नोकरीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉ. स्वाती कुलकर्णी यांना व्हिवा लाउंजच्या मंचावर निमंत्रित करण्यात आले आहे. केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंज हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्या प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

  • कधी – बुधवार, २५ जानेवारी
  • कुठे – लोकमान्य सेवा संघ, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पू.)
  • वेळ – सायंकाळी ५ वाजता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ifs office dr swati kulkarni on loksatta viva lounge