शिवाजी नगर पोलीस आणि विशेष शाखेने संयुक्त कारवाई करून शिवाजी नगर येथून २८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या नागरिकांकडे शिधापत्रिकाही आढळून आल्या आहेत. हा भाग समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या गोवंडी मतदारसंघात येतो.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रफी नगर आणि बाबा नगर येथे बांगलादेशी नागरिक राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक पोलीस आणि विशेष शाखेच्या पथकाने गुरुवारी या परिसरात शोधमोहीम केली. दोन तास चाललेल्या या मोहिमेत २८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यात १४ पुरूष, ६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याचेही आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सर्व जण मजूर  असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अग्रवाल यांनी दिली.
हा भाग समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या गोवंडी मतदारसंघात येतो. आपल्या मतदार संघात एकही बांगलादेशी नागरिक नाही, असा दावा त्यांनी केला होता. तसेच बांगलादेशी आढळल्यास बक्षिस देण्याचेही त्यांनी घोषित केले होते. त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व आहे