दारुखाना परिसरातील पावडर बंदर आणि लकडी बंदर झोपडपट्टीच्या विळख्यात अडकल्याने मुंबईची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घातपाताची शक्यता लक्षात घेऊन ही झोपडपट्टी तात्काळ हटविण्याची सूचना पोलिसांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला केली आहे. मात्र धक्क्यापासून थेट ५० ते ६० फूट समुद्रात लाकडी वाशांवर उभारलेल्या या झोपडपट्टीवर कारवाई कशी करायची, यावर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
ब्रिटिशांच्या काळात दारुखाना परिसरामध्ये मालाची चढ-उतार करण्यासाठी छोटी-छोटी बंदरे उभारण्यात आली होती. त्यापैकीच पावडर बंदर आणि लकडी बंदर. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ही दोन्ही बंदरे झोपडय़ांच्या विळख्यात अडकली आहेत. धक्क्यापासून ५० ते ६० फूट अंतरावर समुद्रात लाकडाचे वासे उभारुन त्यावर झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. आता या झोपडय़ांवर मजलेही चढू लागले आहेत. या दोन्ही बंदरांवर मिळून सुमारे ५५० झोपडय़ा उभ्या राहिल्या असून त्यामध्ये मोठय़ा संख्येने बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत आहेत. या झोपडपट्टीमधील लोकसंख्या आजघडीला चार ते पाच हजाराच्या आसपास पोहोचली आहे. दारुखाना परिसरात छोटे-मोठे काम करुन ही मंडळी आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या परिसरातील जलवाहिन्या फोडून पाणी माफिया झोपडपट्टीवासियांना पाणीपुरवठा करीत आहेत. तसेच वीज चोरीद्वारे येथील झोपडय़ा प्रकाशमान झाल्या आहेत. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी झोपडय़ांपर्यंत पोहोचते. मात्र भरतीच्या पाण्यामुळे झोपडीला जलसमाधी मिळू नये याची विशेष काळजी ती बांधताना घेण्यात आली आहे. टँक बंदर, कौला बंदर, घास बंदरही झोपडय़ांच्या मगरमिठीत अडकू लागले आहेत.
शिपयार्डला खेटून उभ्या असलेल्या या झोपडय़ांमुळे मुंबईची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. भरतीच्या वेळी बोट सहजगत्या या झोपडपट्टीपर्यंत पोहोचू शकते. समुद्रमार्गे येणाऱ्या दहशतवाद्यांना या बंदरांवर उतरल्यानंतर झोपडपट्टीचा आश्रय मिळू शकेल. तसेच मुंबईत घातपात घडविण्यासाठी येथे स्फोटकेही उतरवता येऊ शकतील. परिणामी ही झोपडपट्टी मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असून ती तातडीने जमीनदोस्त करावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही पोलीस दलाकडून मुंबई पोर्ट ट्रस्टला कळविण्यात आले आहे. तथापि,  ट्रस्टने अद्यापही काहीही कारवाई केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबंदरPort
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal slum at port dangerous to mumbai security
First published on: 13-05-2013 at 03:58 IST