वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगरमध्ये अवघ्या आठवडय़ाभरात उभ्या राहिलेल्या सुमारे ४०० हून अधिक अनाधिकृत झोपडय़ा अखेर गुरुवार आणि शुक्रवारी पोलिसांनी महापालिका व एमएसआरडीसी यांच्या मदतीने जमीनदोस्त केल्या. या झोपडय़ा पाडण्यासाठी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दिवसा मोकळी दिसणारी जमीन रात्रीत बांबूंवर पडदे आणि पत्रे लावून झोपडय़ांनी व्यापली जाते, हे मुंबईत सर्वत्र दिसणारे दृश्य आहे. नर्गिस दत्त नगरमध्ये हाच प्रकार गेला आठवडाभर सुरू होता. अवघ्या आठवडय़ात तेथे तब्बल ४०० झोपडय़ा उभ्या राहिल्या.
स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम म्हाडाकडे त्यासंदर्भात तक्रार केली. मात्र म्हाडाने जबाबदारी झटकत ती पालिका आणि एमएसआरडीसीच्या गळ्यात टाकली. त्यानंतर मनसेने एमएसआरडीसी व पालिकेकडे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी कारवाई करण्याची तयारी दाखविली. परंतु आता पोलिसांनी हात आखडता घेतला. मात्र, पोलीस उपआयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी पुरेसे पोलीस सरंक्षण पुरविले. अखेर गुरुवार आणि शुक्रवारी एमएसआरडीसी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व ४०० झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. मनसेचे विभाग अध्यक्ष तुषार आफळे यांनी या झोपडय़ा पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.