राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उड्डाणपुलाखाली बेकायदेशीरपणे ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चे ठेके दिल्याप्रकरणाची पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी विधानसभेत केली.
 सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागेत वाहने उभी करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने २००८ मध्ये घेतला. मात्र या निर्णयाकडे साफ दुर्लक्ष करीत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर १२ उड्डाणपुलाखाली पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्याचे ठेके दिले. त्याबाबत नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेला उत्र देतांना क्षीरसागर यांनी ही घोषणा केली.
बेकायदेशीरपणे उड्डाणपुलाखाली पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्याचे ठेके देण्यात आल्याची बाब लक्षात येताच आपण हे सर्व ठेके रद्द केले. त्यामुळे नाराज झालेल्या ठेकेदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयानेही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजीव यांची चौकशी अधिकारी म्हणून आजच नियुक्ती करण्यात आली असून दोन महिन्यात चौकशी अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
त्यावर शासनाचा निर्णय धुडकावणाऱ्या अधिकाऱ्यांवर आत्ताच कारवाई झाली पाहिजे असा आग्रह सदस्यांनी धरला. मात्र चौकशीनंतर कारवाई करण्याची भूमिका मंत्र्यांनी घेतल्याने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रश्न राखून ठेवला.