मागील दोन वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण ४४ एटीवीएम मशीन्सच्या टच स्क्रीन बदलण्यासाठी तब्बल १२ लाख रूपये खर्च केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार टच स्क्रीन बदलण्याची किंमत केवळ २८ हजार रूपये आहे.
मागील वर्षापासून पश्चिम रेल्वेच्या एकूण आठ आणि मध्य रेल्वेच्या २६ मशीन्सच्या टच स्क्रीन दोष असल्याचे आढळून आले आहे. २०११ मध्ये तब्बल १० कोटी रूपये खर्च करून या मशीन्स बसवण्यात आल्या होत्या.
अलिकडेच घाटकोपर स्थानकावरील मशीनमध्ये दोष असल्याचे आढळून आले होते, तसेच ३ मे रोजी नव्याने लावण्य़ात आलेल्या आठ मशीन्सपैकी एका मशीनची प्रवाशाकडून नासधूस करण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात कलम १४५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या मशीनवर सीसीटिव्ही कॅमेरॅद्वारे देखरेख करण्यात येत होती. या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे पोलिसांना सीसीटिव्ही कॅमेरे मशीन्सच्या अधिक जवळ लावण्य़ास सांगितले आहेत.
रेल्वे प्रशासन या सर्व मशीन्स स्थानकावरील स्कायवॉकच्या नजीक लावत आहेत, जेणेकरून प्रवासी स्कायवॉकचाही वापर करतील आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल. विभागीय रेल्वे अधिकारी मुकेश निगम म्हणाले कि, अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी मशीन्स भविष्यात लावण्यात येणार आहेत.  
अशा प्रकारच्या घटना नागरिकांमध्ये सार्वजनिक गोष्टींबाबत आत्मीयता नसल्याचे दर्शवतात, असे आरपीएफचे उच्च विभागीय सुरक्षा अधिकारी आलोक बोहरा म्हणाले.
कांजूरमार्ग, चेंबूर, विक्रोळी, शहाड, मानखुर्द, वडाळा रोड आणि नालासोपारा या स्थानकांवर मशीन्समध्ये दोष आढळ्याचे रेल्वेच्या लक्षात आले आहे.
प्रत्येकी दिड लाख रूपये किमतीच्या नव्या २० एटीवीएम मशीन्स सीएसटी, विद्याविहार, मुलुंड, नाहूर, कळंबोली आणि घाटकोपर येथे लावण्यात आल्या आहेत.