कोरा केंद्र उड्डाणपुलाच्या अतिरिक्त कामांचे निमित्त

मुंबई : बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात आणखी काही वाढीव कामे करण्याच्या निमित्ताने प्रशासनाने निविदा प्रक्रिया न राबविताच मूळ कंत्राटदाराला ३६० कोटी ३७ लाख रुपयांचे वाढीव कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी ११३ कोटी १६ लाख रुपयांचे कंत्राट याच कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र वाढीव कामाचे कंत्राट त्याच कंत्राटदाराला दिल्यामुळे ६३ कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बोरिवली पश्चिम परिसरातील कोरा केंद्र येथील एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मार्गापासून कल्पना चावला चौकापर्यंत नवा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या उड्डाणपुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ मध्ये हाती घेण्यात आले होते. दोन वर्षांमध्ये उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची अट निविदांमध्ये घालण्यात आली होती. या पुलाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाला १२१ कोटी ७३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. निविदा प्रक्रियेत ७.०४ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंत्राटदाराला ११३ कोटी १६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. आता पुलाच्या कामात वाढ झाली असून सुमारे ३६० कोटी ३७ लाख रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. हे वाढीव कामही मूळ कंत्राटदारालाच देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

एकाच पुलाच्या कामासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबलिणे योग्य होणार नाही. तसे केल्यास खर्चात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या पुलाचे विस्तारीकरण करणाऱ्या कंत्राटदारालाच वाढीव काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालिकेच्या ६३ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल, असा दावा पूल विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

अधिकारी म्हणतात, खर्चात वाढ

बोरिवली पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या जनरल करिअप्पा पूल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या विकास नियोजन रस्त्यावर सुमारे १३५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे. करिअप्पा उड्डाणपुलाचा पूर्वेकडील उतार आणि पश्चिम द्रुतगती मर्गापर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढविण्यात येणार आहे. या वाढीव कामामुळे खर्चात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.