मुंबई : राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मात्र मृत्यांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. डेग्यूच्या रुग्णांच्या संख्येत २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये पाच हजारांनी वाढ झाली आहे. तसेच १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ मध्ये डेंग्यूचे ८१४ रुग्ण आढळले होते. यावर्षी याच कालावधीत १४३५ रुग्ण आढळले आहेत.

वाढते तापमान, वातावरण बदल, शहरीकरण यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील पाच वर्षांमध्ये राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण २०२३ मध्ये आढळले आहेत. राज्यात २०१९ मध्ये १४ हजार ८८८ रुग्ण सापडले होते, तर ४९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर करोनामुळे डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. २०२१ मध्ये १२ हजार ७२० रुग्ण आढळले, तर ४२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये ८ हजार ५७८ रुग्ण सापडले आणि २७ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये १९ हजार २९ रुग्ण सापडले आणि २१ जणांचा मृत्यू झाला होता. डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. मात्र त्याच वेळी मृतांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>>पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १,१६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार; कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध

दरम्यान, गतवर्षी जानेवारी – एप्रिल या कालावधीमध्ये राज्यात डेंग्यूचे ८१४ रुग्ण आढळले होते. तर जानेवारी – एप्रिल २०२४ या कालावधीत एक हजार ४३५ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

डेंग्यूची आकडेवारी

वर्ष        रूग्ण मृत्यू

२०१९ १४८८८ ४९

२०२० ३३५६    १०

२०२१ १२७२० ४२

२०२२ ८५७८      २७

२०२३ १९०२९ २१

२०२४ (एप्रिलपर्यंत) १४३५ ०