व्हीजेटीआयच्या माजी प्राध्यापकाचा उपक्रम
मुंबई विकास आराखडय़ावर गेले तीन महिने राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या विषयातील जाणकार यातील काही त्रुटींवर बोट ठेवत आराखडय़ाला विरोध करत आहेत. मात्र ज्यांच्यासाठी हा विकास आराखडा आहे तो सामान्य माणूस या सर्वापासून दूर आहे. त्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी व्हीजेटीआयचे माजी प्राध्यापक जितेंद्र शाह आणि आशा फॉर एज्युकेशन या सामाजिक संस्थेने ‘तुमच्या विभागाचा नकाशा तुम्ही बनवा आणि आराखडय़ातील त्रुटी दाखवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
विकास आराखडा तयार करताना महानगरपालिकेने सादर केलेले नकाशे हे सामान्यांना समजण्यास तसे अवघड आहेत. याचबरोबर या नकाशांसोबत दिलेली माहितीही फारच तुटपुंजी आहे. उदाहरणार्थ अनेक नकाशांमध्ये विभागातील मोकळी जागाच दाखवली नाही तर एखादी मोठी वस्तीच नकाशात दिसत नाही. अशा एक ना अनेक त्रुटी या नकाशात आढळून आल्या आहेत. यामुळे विकास करताना सद्यस्थिती आणि भविष्यातील स्थिती याचा विचार करूनच तो व्हावा अशा हेतूने प्राध्यापक शाह यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ओपनस्ट्रीट मॅप किंवा फिल्डपेपरसारख्या संकेतस्थळांच्या माध्यमातून अधिक सुस्पष्ट नकाशे त्यांनी तयार केले आहेत. तसेच नकाशात दिसणाऱ्या गोष्टींचे प्रत्यक्ष स्थानही पडताळून पाहिले जात आहे. याचबरोबर प्रत्यक्ष त्या विभागात असलेली ठिकाणे आणि नकाशात न दिसणारी ठिकाणे नकाशात समाविष्ट करून घेतली जात आहे. यामुळे त्या विभागाचा नकाशा परिपूर्ण होतो. याचबरोत पालिकेने त्या विभागाची सादर केलेली माहितीही पडताळून घेतली जात आहे. याशिवाय अतिरिक्त माहितीही नकाशाद्वारे दाखविली जात आहे. पालिकेने विकास आराखडा करताना शाळा, रस्ते, आरोग्य आदी विषयांवर जोर दिला आहे. याच जोडीला शाह यांनी हवेची शुद्धता, दरडोई पाण्याचा वापर, विभागात अनुदानित शाळा किती विनाअनुदानित किती, तेथील रस्त्यांवरून रोज जाणाऱ्या वाहनांची संख्या किती, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, विकास आराखडय़ानंतर रस्त्यांमध्ये होणारे बदल पुरेसे आहेत का या सर्व नोंदी या नकाशाच्या माध्यमातून नोंदविता येणे शक्य होणार असल्याचे शाह यांनी सांगितले. हे सर्व करण्यासाठी शाह यांनी शोलय विद्यार्थ्यांची मदत घेतली असून पीडीएफमध्ये उपलब्ध नकाशे डिजिटल स्वरूपात रूपांतरित केले. यानंतर लोकांच्या मदतीने हे काम सुरू केल्याचे शाह यांनी सांगितले. जर अधिकाधिक लोक या उपक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी नकाशांच्या माध्यमातून बदल सुचविले तर मुंबईचा विकास आराखडा अधिक सक्षम होऊ शकतो, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. लोकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ashamumbai76@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.