चौकशीसाठी स्वतंत्र पथक; सनातनवर बंदीची भुजबळांची मागणी

मुंबई : लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक जीवनात काम करीत असताना येणाऱ्या मारण्याच्या धमक्यांनी मंत्री आणि आमदार चांगेलच धास्तावल्याचे चित्र गुरुवारी विधानसभेत बघायला मिळाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याप्रमाणेच आम्हालाही धमक्या येत असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केल्यावर चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जर्यंसग रजपूत याला कर्नाटकातील बंगळूरुयेथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन विधिमंडळाचा सदस्य असो वा सामान्य नागरिकांची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे, म्हणून या विषयाचा अभ्यास करण्यासाठी, तसेच आलेल्या धमक्या, घडलेली घटना यांचा तपास करण्याचे काम ही एसआयटी करेल. तसेच भविष्यकाळातील उपाययोजना यासाठीचे धोरणही ही एसआयटी तयार करेल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

आपल्यालाही धमक्या येत असल्याच्या तक्रारी अनेक आमदारांनी केल्या. नरेंद्र दाभोलकर, र्गोंवद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी आदी  विचारवंतांच्या हत्या झाल्या आहेत. या सर्व घटनांचे कर्नाटकातील असलेले संबंध लक्षात घेता ठाकरे यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेण्याची मागणी प्रभू यांनी केली. आपल्यालाही धमक्या येत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून राज्यातील काही नेत्यांना आणि राज्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे एसआयटी गठित करून राज्याच्या बदनामीचे कारस्थान उघड करावे अशी मागणीही मलिक यांनी केली. सनातन संस्थेच्या कारवायांवर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. या संस्थेच्या सदस्यांना हत्येप्रकरणी अटक झाली आहे. अशा या सनातनवर बंदीची मागणी छगन भुजबळ यांनी केली. 

विचारवंतांचे मारेकरी राज्यातीलच : फडणवीस

आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा निषेध करतानाच सत्ताधाऱ्यांनी या घटनेला राजकीय रंग देऊ नये, विचारवंतांच्या हत्येच्या काही घटना राज्यातच घडल्या असून त्यांचे मारेकरीही राज्यातीलच आहेत याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सबळ पुरावे असतील तर सनातनच काय तर रजा अकादमीवरही बंदी घालण्याची मागणीही फडणवीस यांनी केली.