एप्रिल-मे महिन्यांत भाज्यांच्या किमती वाढलेल्या असताना आता सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्यांच्या किमती अवघ्या महिन्याभरात तब्बल २० ते ३० रुपयांनी कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे महिन्याचे वाणसामानाचे गणित कोलमडले आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत मूगडाळ वगळता तूर, उडीद, चणा, मसूर अशा इतर सर्वच डाळींच्या किमती १०० रुपयांच्या आतच होत्या. परंतु, महिनाभरानंतर तूर डाळ थेट १२० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर किलोला ९६ रुपयांच्या आसपास असलेला अख्खा मूग १२० रुपयांवर गेला आहे. ‘या किमतींवर विश्वास न बसल्याने आमचे नेहमीचे ग्राहकही इतर दुकांनांमध्ये चौकशी करून किमतीची खातरजमा करून घेत आहेत. आणि त्यानंतरच खरेदी करीत आहेत,’ असे गोराईच्या ‘संजय सुपर मार्केट’चे मोहन चौधरी यांनी सांगितले. त्यातल्या त्यात गहू आणि कोलम, बासमतीसारख्या तांदळाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा आहे. मात्र, डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसतो आहे.