दादरच्या ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ संचलित इंग्रजी माध्यमाच्या ‘पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळे’तील दुसऱ्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारण्यात येत असलेल्या शिक्षणशुल्कावरून पालक आणि संस्थाचालक यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. गतवर्षी पहिली इयत्तेसाठी आकारण्यात आलेल्या दुप्पट शुल्काचा भरणा करणाऱ्या पालकांनी दुसरीसाठीही तितकेच शुल्क आकारण्याच्या शाळेच्या निर्णयाविरोधात तक्रारी केल्या असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
या शाळेत गेल्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्करचनेवरून हा वाद सुरू झाला. शाळेत २०१५पर्यंत इयत्ता पहिलीकरिता २१ हजार रुपये इतके शुल्क आकारले जात होते. परंतु, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क एकदम ४१ हजार रुपये इतके वाढविण्यात आल्याचे एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ‘‘आम्ही या शुल्करचनेवर तेव्हाच आक्षेप घेतला होता.
मात्र ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या’नुसार तुकडीतील विद्यार्थी संख्या कमी केल्याने शुल्क वाढविण्यात येत असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले होते.
पुढील वर्षी शुल्क कमी करू, या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या अटीवरच आम्ही विरोध मागे घेतला. मात्र यंदा दुसरीत गेलेल्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा तितकेच म्हणजे ४२ हजार रुपयांच्या आसपास शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे, आमच्यामध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे,’’ अशी तक्रार आणखी एका पालकाने केली.
पालकांनी संस्थाचालकांची भेट घेऊन शुल्क कमी करण्याची मागणी केली. मात्र, पालकांचे समाधान न झाल्याने हा वाद विकोपाला गेला आहे. म्हणून पालकांनी या शुल्कवाढीबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. तावडे यांनी प्राथमिक शिक्षण संचालकांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात ‘आयईएस’चे सतीश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शुल्कवाढीचे समर्थन केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक वर्गात किमान ४० विद्यार्थी असावे, असे बंधन आहे. त्यानुसार आम्ही विद्यार्थी संख्या कमी केली आहे. यामुळेच शुल्क वाढवावे लागले आहे, असा खुलासा त्यांनी केला.