शैलजा तिवले

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आता विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सोमवारपासून रेल्वे स्थानकात केल्या जाणार आहेत. पालिकेने चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचे ठरविले असून दिवसाला ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टीने शहरात गर्दीची रेल्वे स्थानके, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत.

शहरात सध्या दरदिवशी सुमारे २० हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात असून सुमारे अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. बाधितांचे प्रमाणही आठवडाभरात पाच टक्क्यांहून सुमारे १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ इत्यादी जिल्ह््यांमध्ये संसर्ग प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून येथून अनेक प्रवासी दरदिवशी मुंबईत दाखल होत आहेत. तेव्हा यांच्यामार्फतही संसर्गप्रसार वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा याला प्रतिबंध करण्यासाठी सोमवारपासून विदर्भातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानकावर प्रतिजन चाचण्या करण्यात येतील. यात बाधित आढळलेल्यांचे नियमावलीनुसार विलगीकरण केले जाईल. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दादर, वांद्रे अशी गर्दीची रेल्वे स्थानके, बाजार इत्यादी ठिकाणी पालिकेकडून मोफत चाचण्या उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली.