सरलेले संवत्सर कंपन्यांसाठी उपकारक, गुंतवणूकदारांना फलदायी

मुंबई : सरलेल्या संवत्सर २०७७ मध्ये भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, ४७ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ८६,६५० कोटींचा विक्रमी निधी उभारला.

विक्रम संवत्सर २०७७ मध्ये म्हणजेच मागील दिवाळीपासून सेन्सेक्समध्ये १६,१३३.९४ अंशांची म्हणजेच ३६.९७ टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये ५,०४८.९५ अंशांची भर पडून हा निर्देशांक ३९.५० टक्क्यांनी वधारला. या तेजीचा फायदा घेत कंपन्यांनी प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून मोठा निधी उभारला.

प्राथमिक बाजारात आयपीओचा महापूर आला. घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोने सरलेल्या वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून सर्वाधिक ९,३७५ कोटींचा निधी उभारला. त्यापाठोपाठ पॉवरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने ७,७३५ कोटी, ग्लँड फार्माने ६,४८० कोटी, सोना कॉमस्टारने ५५५० कोटी आणि नुव्होको व्हिस्टास कॉर्पोरेशनने ५,००० कोटी रुपयांचा निधी उभारला.

कामगिरीच्या मोर्चावर…

भांडवली बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेल्या ४७ कंपन्यांपैकी ३५ कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत भर घातली. त्यापैकी १५ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना बहुप्रसवा (मल्टीबॅगर) परतावा दिला. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज आणि नुरेका या कंपन्यांच्या समभागांनी अनुक्रमे तब्बल ३५९ टक्के आणि ३३१ टक्के परतावा दिला. त्यापाठोपाठ लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी, एमटीएआर टेक्नॉलॉजीज आणि इझी ट्रिप प्लॅनर्सने २०० टक्क्यांहून परतावा दिला. बर्गर किंग इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, तत्त्व चिंतन फार्मा केम, ग्लँड फामा, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज आणि नझारा टेक्नॉलॉजीजने संवत्सर २०७७ मध्ये १११ ते १८५ टक्क्यांपर्यंत परतावा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे.

निराशाजनक कामगिरी

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, विंडलास बायोटेक, कृष्णा डायग्नोस्टिक्स, कार ट्रेड टेक, ग्लेनमार्क  लाइफ सायन्सेस, कल्याण ज्वेलर्स इंडिया आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीने मात्र गुंतवणूककारांना निराश केले.  प्रारंभिक समभाग विक्रीसाठी निश्चित केलेल्या किमतीपेक्षा या कंपन्यांचे समभाग कमी किमतीवर सूचिबद्ध झाले. गुंतवणूकदारांना १० ते ४३ टक्क्यांच्या तोटा सहन करावा लागला.

चालू महिन्यात पाच कंपन्यांवर गुंतवणूकदारांची बोली

विद्यमान नोव्हेंबर महिन्यात पाच कंपन्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून सुमारे २७,००० कोटींचा निधी उभारणार आहेत. यामध्ये पेटीएम, पॉलिसी बझार, सॅफायर फूड्स इंडिया, एसजेएस एंटरप्रायझेस आणि सिगाची इंडस्ट्रीजचा समावेश आहे.