मुंबई : मी लखनऊचा आहे आणि  कोणालाही एकेरी नावाने हाक मारत नाही. माझ्यापेक्षा ३०-४० वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तींनाही ‘आप’ म्हणूनच संबोधत आलो आहे, असे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देताना सांगितले.

फेब्रुवारी २०२० मध्ये कंगना हिने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अख्तर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगना हिने केला होता. या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी कंगना हिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. बुधवारी अख्तर यांची याप्रकरणी साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी कंगना हिने बदनामी करणारे वक्तव्य केल्याचे अख्तर यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच कंगना हिच्या आरोपांकडे फार लक्ष दिले नसल्याचेही म्हटले. कंगना हिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याआधीही खूप विचार केल्याचे अख्तर यांनी सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलाखत देताना कंगना हिने आपली बदनामी करणारे आरोप केले होते. आपण तिला वाईट वागणूक दिल्याचे आणि ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल, अशी वागणूक दिल्याचाही आरोप तिने केला होता.