गिरगाव चौपाटीवरील जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेमध्ये पर्यटनासाठी धक्का (जेट्टी) उभारण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने भाजपला धक्का दिला. एक सुविधा बंद करून दुसरी सुविधा सुरू करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण देत सुधार समितीने गिरगाव चौपाटीवरील धक्क्याचा प्रस्ताव नामंजूर केला. मात्र यामुळे हिरमुसलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी वरिष्ठ पातळीवरून हा धक्का उभारण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे नमूद केले.

केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाने मुंबई बंदर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याची योजना आखली असून त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने एक आराखडा तयार केला आहे. गिरगाव चौपाटीवर मनोरंजन केंद्र उभारण्यासाठी पालिकेला जमीन देण्याचा प्रस्ताव सरकारने १६ ऑगस्ट १९५६ रोजी सादर केला होता. या प्रस्तावानुसार सरकारकडून पालिकेला चौपाटीलगतचा ५८५२.८९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्यात आला होता. त्यानंतर यालगत असलेला ५८१.१० चौरस मीटर क्षेत्रफळाचा आणखी एक भूखंड पालिकेला देण्यात आला. शासनाच्या मंजुरीनंतर पालिकेने ६४३३.९९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर बिर्ला क्रीडा केंद्र उभारले. एकूण भूखंडापैकी २७९१.४४ चौरस मीटर क्षेत्रफळावर बिर्ला क्रीडा केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात आले आणि उर्वरित जागेवर गच्ची बगीचा, उपाहारगृह उभे राहिले. आजघडीला सभागृह मोडकळीस आले असून दुरुस्तीसाठी ते बंद ठेवण्यात आले आहे. दोन तालीम कक्ष शुल्क आकारणी करून नृत्य व नाटकांच्या तालमींसाठी देण्यात येत आहे. बिर्ला क्रीडा केंद्रातील उपाहारगृहासाठी ७८३ चौरस मीटर क्षेत्रफळ इतकी जागा ठक्कर कॅटर्सला देण्यात आली आहे. ठक्कर कॅटर्सबरोबर करण्यात आलेल्या कराराची मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे.केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या पर्यटन योजनेनुसार मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबई बंदराच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर धक्का उभारण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा धक्का उभारण्यात येणार आहे. हा धक्का मरिन ड्राइव्हशी जोडण्यात येणार आहे. बिर्ला क्रीडा केंद्रातील मोकळी जागा, अस्तित्वात असलेल्या इमारतीचा वापर प्रवाशांचे टर्मिनल, प्रसाधनगृह, भांडार कक्ष व उपाहारगृहासाठी करण्याचा मानस आहे. हा भूखंड मुंबई पोर्ट ट्रस्टला उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.

केंद्राकडून परवानगी मिळविणार

कलावंत आणि कला रसिकांसाठी असलेली एक सुविधा बंद करून तेथे दुसरी सुविधा सुरू करणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट करीत सुधार समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रस्ताव फेटाळून शिवसेनेने भाजपला धक्का दिल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली. कोणत्याही परिस्थितीत पर्यटनाला चालना देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर धक्का उभारण्यात येईल. त्यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांना एक नवे पर्यटनस्थळ उपलब्ध होईल. त्यामुळे सुधार समितीने हा प्रस्ताव फेटाळला असला तरी सरकारच्या माध्यमातून गिरगाव चौपाटीवर धक्का उभारण्यास परवानगी मिळविण्यात येईल, असे भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.