दांडियाच्या वेशभूषेवर दागिन्यांचा साज चढविण्यासाठी तरुणींनी झुमके, पैंजण, बांगडय़ांसोबतच ‘चांदबाली’ला पसंती दिली आहे. कुलाब्याच्या बाजारात ऑक्साईडचे झुमके, बांगडय़ा, पैंजण, कमरपट्टी खरेदीसाठी तरुणींची झुंबड उडाली आहे. नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना घागरा, चनिया-चोली या कपडय़ांवर मोठ-मोठे झुमके वापरतात; मात्र त्यातही ‘चांदबाली’चा बाजारात बोलबाला आहे. चंद्राच्या आकारात कानात डुलणारी चांदबाली बिट्स, मोती आणि खडय़ांनी सजलेली असते.
लहानखुऱ्या घुंगरांतही ही चांदबाली चमकत असते. सध्या मोठय़ा आकाराच्या चांदबालीला जास्त मागणी आहे, असे दुकानदार रहीम शेख यांनी सांगितले. २५० रुपयांपासून चांदबालीची किंमत वाढत जाते.
दागिने हा भाग सजण्याचा आहेच, पण नक्षीकाम केलेल्या छोटय़ा आकाराच्या रंगीबेरंगी पर्स घागरा वा चनियाचोलीवर जुळविलेल्या जातात. गेल्या वर्षी रेशीमच्या बांगडय़ांचा मोठा बोलबाला होता. यंदा रेशीमच्या दागिन्यांऐवजी ऑक्साईडच्या दागिन्यांची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
ऑनलाइन बाजारात दागिन्यांवर सवलती दिल्या जात आहे. अनेक संकेतस्थळांवर ७० टक्क्यांपर्यंत सवलती मिळत आहे. त्यामुळे दीड हजारांचे दागिने काही ५०० ते ६०० पर्यंत विकले जात आहेत. ऑनलाइन बाजारात रेशीमच्या गोंडय़ाचे दागिने, त्यातही रेशमी गोंडे लावलेले पैंजण ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.