कन्हैया कुमारच्या वरळीतील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यक्रम स्थळ बदलण्यात आल्यानंतर आता पुण्यातील त्याच्या नियोजित कार्यक्रमातही बदल करण्यात आला आहे. पुण्याच्या राष्ट्रसेवा दल कार्यालय येथे नियोजित करण्यात आलेल्या कन्हैयाच्या सभेचे स्थळ बदलण्यात आले असून, येत्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे कन्हैयाची सभा होणार आहे. विशेष म्हणजे, कन्हैयाच्या सभेसाठी बालगंधर्वमध्ये रविवारी नियोजित असलेला सुरेल सभा या संस्थेचा कार्यक्रम महापौर प्रशांत जगताप यांनी मागे घेतला आहे.
दरम्यान, कन्हैयाचा उद्या मुंबईत टिळकनगरमधील सभागृहात कार्यक्रम होणार आहे. कन्हैयाची सभा घ्यायची असेल तर केवळ आमंत्रितांना बोलवा, तसेच या आमंत्रितांची नावे व पत्त्याची यादी आमच्याकडे द्या अशी अट पोलिसांनी घातली होती. त्यामुळे आयोजकांनी कन्हैयाच्या सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. वरळी येथील जनता शिक्षण संस्थेत कन्हैयाची सभा होणार होती. त्यावर संघटनांच्या आयोजकांना पोलिसांनी २४ अटी घातल्या. मात्र, एका दिवसात सर्व अटी पूर्ण करणे शक्य नसल्याने स्थळ बदलण्यात आले. यासंबंधी डाव्या संघटना आणि पोलिसांमध्ये वाटाघाटी चालू आहेत. मात्र, काहीही झाले तरी हा कार्यक्रम होणारच असे डाव्या संघटनांकडून म्हटले जातेय.
यापूर्वी, कन्हैयाच्या नागपूर येथील सभेत चप्पलफेक, दगडफेक असे प्रकार घडले होते.