scorecardresearch

काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? उद्धव ठाकरेंसमोर तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो…”

पत्रकारांनी काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? असा प्रश्न विचारला. यावर केसीआर यांनी मी स्पष्ट सांगतो म्हणत आपली भूमिका मांडली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या भेटीनंतर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली. तेव्हा पत्रकारांनी काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? असा प्रश्न विचारला. यावर केसीआर यांनी मी स्पष्ट सांगतो म्हणत आपली भूमिका मांडली.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “आज आमच्या दोघांच्या चर्चेने एक सुरुवात झालीय. आम्ही स्पष्ट सांगितलंय की यात कोणतीही भविष्यवाणी करण्याची गरज नाही. आम्ही देशाच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि जो निर्णय होईल तो देशासमोर ठेऊ.”

“केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा खूप वाईट पद्धतीने वापर सुरू”

“केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा खूप वाईट पद्धतीने वापर सुरू आहे यात कोणतीही शंका नाही. हा असा दुरुपयोग व्हायला नको होता. मी याचा निषेध करतो. केंद्राने त्यांचं धोरण बदलायला हवं. जर त्यांनी हे धोरण बदललं नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. असे प्रकार देशाने पाहिले आहेत,” असं चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो”

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.”

“महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं”

“मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं केसीआर यांनी सांगितलं.

“सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत”

केसीआर म्हणाले, “देशाचं राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर आमचं एकमत झालं. यापुढे देशाच्या विकासासाठी, देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी, धोरण बदलावरही चर्चा झाली. या सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत.”

हेही वाचा : “स्वतःचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले आणि…”, सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

“पुढील काळात एकत्र काम करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. देशात असे अनेक लोक आहेत जे आमच्यासारखा विचार करतात. त्या लोकांसोबत देखील माझी चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा सुरू होती. काही दिवसातच हैदराबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्रित भेटू आणि चर्चा करून एक मार्ग ठरवू,” असंही चंद्रशेखर राव यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kcr answer on possibility of national front against bjp excluding congress pbs

ताज्या बातम्या