भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले आणि गायब केले, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या नीलम नगर मुलुंड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये १५ मिनिटे चर्चा देखील झाली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेची मान खाली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे १९ बंगले गायब केले. महाराष्ट्राच्या जनतेची यामुळे मान झुकली. हा मुख्यमंत्री कसा? एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले, गायब केले. बाकीच्या गुंडागर्दीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था राखणं आहे. मात्र, शिवसेनेच्या दादागिरीसमोर प्रशासन देखील झुकत आहे.”
“महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्र भाजपाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता महाराष्ट्र घोटाळेमुक्त करण्यासाठी मैदानात आलाय,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
“पोलिसांवर विश्वास करून चालणार नाही”
किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घोटाळ्यांसंबधी चर्चा झाली. याशिवाय गेले काही दिवस माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यावरही चर्चा झाली. पुण्यानंतर काल कोरलईला देखील अधिकृत वेळ घेऊन गेलेलो असताना देखील शिवसेनेचे गुंड तिथे पोहचली कशी? त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की तुम्हाला सीआयएसएफ आणि मोदी सरकारने दिलेले सुरक्षेचे नियम पाळावे लागतील. पोलिसांवर खालच्या सुरक्षेवर विश्वास करून चालणार नाही.”
हेही वाचा : “पोलिसांवर विश्वास करून चालणार नाही, CISF ने सांगितलेले…”, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला
“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की गतीने पुढे जा”
“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की गतीने पुढे जा, महाराष्ट्र भाजपा आणि पूर्ण महाराष्ट्राची जनता तुमच्यासोबत आहे. काहीही, केव्हाही अडचण वाटली तर मला सांगा, परंतू महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचं आहे,” असंही किरीट सोमय्या यांनी नमूद केलं.