शिवसेना खासदार भावना गवळी यांनी ईडीच्या चौथ्या समन्सलाही उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भावना गवळी या ईडी चौकशीला उपस्थित राहणार नसून त्यांचे वकील ईडी कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांकडून वेळ मागून घेणार आहेत. भावना गवळी यांनी चौकशीसाठी उपस्थित रहावं यासाठी ईडीकडून त्यांना चारवेळा समन्स बजावण्यात आले आहे, पण भावना गवळी एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. यावरून किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर टीका केली.

भावना गवळी यांना इडिसमोर चौकशीसाठी हजर राहण्यात कशाची भीती वाटते? असा प्रश्न उपस्थित करत याचा हिशोब तर द्यावाच लागेल असं किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

भावना गवळी यांच्यावर नक्की कुठले आरोप आहेत?

भावना गवळी यांच्यावर सरकारची परवानगी नसतानाही कारखाना विकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. १९९२ साली ‘बालाजी पार्टीकल’ या कारखान्याची नोंदणी करून स्थापना करण्यात आली. या कारखान्याला राज्य सरकारच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमनं ४३ कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र, ४३ कोटी रुपयांचं कर्ज मिळवूनही कारखाना २००० सालापर्यंत सुरू झालाच नाही.

२००१ साली भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या आणि २००२ साली या कारखान्याची जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या संस्थेला विकली. राज्य सरकारनं २००७ रोजी कारखाना विकण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली. यासाठी काही नियमावली बनवण्यात आली होती. २०१० साली हा कारखाना भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकला. या व्यवहारालासुद्धा सरकारची परवानगी घेण्यात आली नव्हती.

या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीनं नोटीस बजावली होती. भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. गवळी यांना चौकशीसाठी ईडीकडून चार वेळा समन्स बजावण्यात आले होते.

हेही वाचा : “४८ तासात माफी मागितली नाही, तर आम्ही…”; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना इशारा

प्रत्येकवेळी खासदार भावना गवळी यांच्या ऐवजी त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहतात आणि ईडीकडून वेळ मागून घेतात. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांना कशाची भीती वाटते? असा प्रश्न विचारत जमीन विक्रीच्या व्यवहाराबाबत उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.