भाजपाच्या जाहीर झालेल्या तीन उमेदवार याद्यांमध्ये अद्यापही खासदार किरीट सोमय्या यांचे नाव नसल्यामुळे विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत. किरीट सोमय्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांना डावलणार नाही. ते ईशान्य मुंबईतून आमचे उमेदवार असतील असे मुंबई भाजपा प्रदेशमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

रविवारी नवी दिल्लीतून मुंबईतील तीन पैकी दोन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर होतील. ईशान्य मुंबईतून पक्षाने अद्यापही उमेदवारांचे नाव जाहीर केले नसल्यामुळे सोमय्या यांच्यावर उमेदवारीवरुन विविध तर्क-विर्तक सुरु आहेत. किरीट सोमय्या हे मुंबईतील भाजपाचे वजनदार नेते आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना अनेक मुद्यांवर त्यांनी आंदोलने केली होती.

पण मध्यंतरी त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेत थेट मातोश्रीला लक्ष्य केले. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास मतपेटीतून त्याचे पडसाद उमटण्याची भिती आहे. म्हणूनच अद्यापर्यंत किरीट सोमय्या यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांची संपत्ती जाहीर करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे.

किरीट सोमय्यांना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी मतदारसंघामध्ये गाठी-भेटी घेऊन प्रचार सुरु केला आहे. पक्ष कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे वर्तन ही सोमय्या यांच्या विरोधात मुख्य तक्रार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या यांची संसदेतील उपस्थिती, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेले काम याबद्दल प्रश्नच नाही. पण शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेली नाराजीची चिंता आहे असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.